‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबईतील उड्डाणपूल हे महत्वाचे प्रकल्प नितीन गडकरी नसते तर प्रत्यक्षातच आले नसते,’ अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची स्तुती केली. तर ‘या प्रकल्पांबाबत शिवसेनाप्रमुखांनंतर राज ठाकरे या एकमेव व्यक्तीने आस्था दाखविली होती,’ असे सांगत गडकरींनी राज यांची तारीफ केली. निमित्त होते, गोदा उद्यानाच्या नुतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळय़ाचे.
राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या संकुचित विचारांविषयी केलेल्या टिप्पणीमुळे नाशिक महापालिकेत मनसे-भाजपमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवर या सोहळ्याच्या माध्यमातून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. या सोहळ्यास गडकरी उपस्थित राहणार नाहीत असा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अंदाज होता. परंतु, स्वकीयांना धक्का देत गडकरी या कार्यक्रमाला हजर राहिले. गडकरी हे प्रगतीचा विचार करणारी व्यक्ती आहे. शिवसेनाप्रमुखांची इच्छा असणारे सर्व प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यास त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. गडकरी यांच्या काळात नफ्यात असणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आज तोटय़ात गेल्याकडे राज यांनी या वेळी लक्ष वेधले. तर, गडकरी यांनी राज यांच्याकडे विकासाचा दृष्टीकोन असल्याचे सांगितले. राज यांच्या दूरदृष्टीचे गुणगान गात गडकरींनी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला, तर राज यांनीही गडकरींची स्तुती करताना विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला.
मनसेचा राष्ट्रवादीला धक्का
गोदा उद्यानाला राष्ट्रवादी व आप यांच्यासह काही संघटनांकडून विरोध होत आहे. या पाश्र्वभूमीवर मनसेने काँग्रेसचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करत अनेकांना आश्चर्यचकीत केले.
’गडकरी यांनीही गोदा उद्यानाची प्रशंसा करताना असे प्रकल्प इतर शहरांमध्ये साकारल्यास महाराष्ट्र सुंदर होण्यास वेळ लागणार नाही, असे म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2014 रोजी प्रकाशित
स्तुतिसुमनांचा ‘एक्स्प्रेस वे’
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबईतील उड्डाणपूल हे महत्वाचे प्रकल्प नितीन गडकरी नसते तर प्रत्यक्षातच आले नसते
First published on: 23-02-2014 at 02:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackery nitin gadkari at goda park