महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी नाशिकमधील घोटी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी गारपीटग्रस्तांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून राज यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली व्होटबँक असणा-या मतदारसंघातील गारपीटग्रस्त भागाचाच दौरा केला. महाराष्ट्रातील गारपीटग्रस्तांना मदत करताना काँग्रेस-राष्ट्रवादीने राजकारण केल्याचा आरोप यावेळी राज यांनी केला.
यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गुजरातमधील विकासकामांचे कौतुक केले. गुजरात राज्यातील खेडोपाड्यांत विकास होतो तर महाराष्ट्रात अशाप्रकारचा विकास का शक्य नाही असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांसारखे नेते मतांसाठी परप्रांतीयांवर अवलंबून आहेत. या मतदारांनी निवडणुकांच्या काळात गावी जाऊ नये यासाठी निवडणुकांनंतर या मतदारांच्या रेल्वे तिकीटांचे आरक्षण करण्याची सोय नाईकांनी केल्याची माहिती राज यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने या सगळ्याचा गांभीर्याने विचार करून मतदान करावे असे आवाहन राज ठाकरे यांनी या सभेत केले. नाशिकचे खासदार आणि भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी आजपर्यंत नाशिकमधील जनतेचा कोणता प्रश्न संसदेत मांडला असा सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे नाशिकमधल्या जनतेने येत्या निवडणुकीत समीर भुजबळांना आपली जागा दाखवून द्यावी असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच मतदारांनीसुद्धा योग्य प्रश्न घेऊन खासदारांकडे जावे, त्यासाठी मतदारांनी खासदारांच्या कर्तव्यांची माहिती करून घेण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी मतदारांना दिला. नाशिककरांचे प्रश्न खंबीरपणे संसदेत मांडायचे असतील तर, येत्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना विजयी करावे असे आवाहन राज यांनी जाहीर सभेत केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
आघाडीचे नेते मराठी मतदारांना गृहीत धरतात- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी नाशिकमधील घोटी येथे जाहीर सभा घेतली.
First published on: 05-04-2014 at 07:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackrey attack on congress ncp