कोल्हापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिकास साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात साकारत आहे. जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉ.बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी टीना गवळी यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली.
२०१९ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती, असे नमूद करून आमदार यड्रावकर म्हणाले, सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते. शिवतीर्थची जागा राज्य शासनाची होती. मी मंत्रिमंडळात सदस्य होतो. त्यामुळे सदरची जागा विना मोबदला जयसिंगपूर नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर करून जवळपास तीन कोटी रुपये किमतीची जागा आपणास मोफत मिळवता आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती आली. ते काम पूर्ण झाले.
मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मत मतांतरे झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या क्रांती चौक परिसरामध्ये व्हावा, अशी मागणी काही भीमसैनिकानी केली. यासाठी क्रांती चौक परिसरात असलेल्या बस स्थानकाच्या जवळ शिरोळ नृसिंहवाडी रोड लगत सर्वे नंबर १२६६ मध्ये पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. अगदी आठवडाभरातच तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने एसटी महामंडळाच्या ताब्यात असणारी जागा जयसिंगपूर नगरपरिषदेकडे पुतळा उभारण्यासाठी वर्ग करण्यात आली. पण याही ठिकाणी पुतळा उभारण्यास काहींनी आक्षेप घेतला.
पुतळा उभारण्यासाठी अपेक्षित असलेली १२५१ ची जागा न्यायालयाच्या वहिवाटीस असून त्यांच्या ताब्यात होती , आजही आहे. शिवाय जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी सदरची जागा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी आम्हाला हवी आहे, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले होते. तसेच वरिष्ठ न्यायालयाकडेही अशीच मागणी जयसिंगपूर न्यायालयाने केली होती.
न्यायालयीन इमारत असलेली ही जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची आम्ही आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली. सदरची जागा जिल्हा न्यायालयाच्या वहिवाटी मध्ये असल्याने सदरची जागा देता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिले.
त्यानंतर संजय पाटील यड्रावकर व आंबेडकरवादी चळवळीतील शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या जागेबाबत भेट घेतली असता त्यांनी देखील न्यायालयाची ही जागा देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याविषयी आणखी किती वर्ष लागतील याचा कालावधी निश्चित होत नाही. न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुतळा उभारणीचे काम अनेक वर्ष रखडले जाईल म्हणून पुतळा लवकर उभारण्यात यावा याकरिता लोकप्रतिनिधी व तालुक्यातील भीमसैनिकांच्या शिष्टमंडळांनी माझी भेट घेतली. यातूनच जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाच्या उजव्या बाजूस सांगली-कोल्हापूर रोडलगतच जयसिंगपूर बसस्थानका समोरची असणारी जागा निश्चित करुन या उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांनी यावेळी दिली.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर नगरपरिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन पुतळा उभा करण्याचे निश्चित केले आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने अनेक वर्षांपासून राहत आहेत. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सांगली- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूला शिवतीर्थ तर दुसऱ्या बाजूला उभारण्यात येणारी भीमसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची ही स्मारके जयसिंगपूर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ठरतील. ही बाब शहरवासीयांबरोबरच शिरोळ तालुक्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असेल, असेही आमदार यड्रावकर यांनी यावेळी सांगितले
सि.स.न.१२५१ च्या न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या जागेसाठी न्यायालयीन लढा भीमसैनिक, मी स्वतः व जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून चालू ठेवला जाईल. न्यायालयाच्या माध्यमातून या जागेचा ताबा मिळताच त्या ठिकाणी म्युझियम व स्पर्धा परीक्षा केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणून उभा करण्यात येईल असे सांगून आमदार यड्रावकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानात उजव्या बाजूस कोल्हापूर- सांगली रोड लगत जयसिंगपूर बसस्थानकामोर उभा करताना राष्ट्रीय महामार्गाचे सर्व नियम पाळून आखीव रेखीव आणि सुंदर असा पुतळा उभा करण्यात येणार आहे. या जागेत तळमजल्या मध्ये सुसज्ज ग्रंथालय तर पहिल्या मजल्यावर बुद्धिस्ट कल्चरचे डोम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडीचे शिल्प साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संविधान सभा, चवदार तळे सत्याग्रह, माणगांव परिषद, काळाराम मंदिर सत्याग्रह असे महत्त्वाचे शिल्प या ठिकाणी उभारले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट घेवून संविधान लिहून देशाला अर्पण केले. त्या संविधानाची प्रतिकृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस बसविली जाणार आहे. या ठिकाणी उत्कृष्ट सजावट तयार करून भीमसृष्टी उभा करण्यात येणार आहे.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेले विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने संविधानामध्ये प्रतिबिंबित केले आहेत. अशा या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टी उभा करताना आत्यानंद होत आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीला ऊर्जा, विचार आणि प्रेरणा मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी साथ द्यावी, असे यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा आणि भीमसृष्टीची चित्रफित यावेळी प्रकाशित करण्यात आली आणि घोषणा आणि टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले. देवेंद्र कांबळे, माजी जि.प. सदस्य विकास कांबळे, पांडूरंग चंदुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील, यड्रावकर, ॲड. अनिरुद्ध कांबळे, ॲड. संभाजी कांबळे, मिलिंद शिंदे, पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, संजय शिंदे, अनुप मधाळे, आर्किटेक निखिल थोरात, संभाजी मोरे, ॲड. संभाजीराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.
पुतळ्याचा आगमन सोहळा
जयसिंगपूर शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा २१ सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिरोळ तालुक्यात निळे वादळ निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निळा सलाम देण्यासाठी तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी आगमन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष
गेल्या ३५ वर्षापासून जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नाला आज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने मूर्त स्वरूप मिळाले. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे आगमन होणार असल्याने शिरोळ तालुक्यातील भीमसैनिकांनी जयसिंगपूर येथील क्रांती चौकात फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.