कल्याण ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे रस्त्यांची झालेली दुरावस्था याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं. याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ असं नाही, असा सूचक इशारा दिला. तसेच जेथे अन्याय दिसेल तेथे आम्ही बोलणार आहोत. आमच्या पद्धतीने हा अन्याय मांडणार आहोत, असा इशारा सरकारला दिला.

शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रीमंडळ विस्तरावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे खोचक सवाल केला होता. सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या ट्वीटनंतर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रखडलेले रस्ते व रस्त्यांची दुरावस्था याबाबत पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं.

“बॅनर फाडले तरी कामे सुरू झाली नाहीत”

रखडलेली रस्त्यांची कामे व रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे याबाबत राजू पाटील यांना विचारलं असता त्यांनी एम.आय.डी.सी. भागात रस्त्यांची कामं सुरू व्हावीत यासाठी बॅनर फाडले, उलटे लावून झाले तरी कामे अजून सुरू झाली नाहीत, टोला सरकारला लगावला.

“आम्ही समर्थन दिले म्हणजे वाईट गोष्टींनाही समर्थन नाही”

राजू पाटील पुढे म्हणाले, “आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल. कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतोय. यामागे कोणावर टीका करायची भावना नाही, तर या कामाकडे लक्ष द्या अशी आहे. जिथे कामे झालेली नसतील, तिथे आम्ही बोलणारच आहोत.”

“जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेणार नाही”

“आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे अन्याय दिसेल, तिथे आम्ही बोलणार आहोत. आमच्या पद्धतीने मांडणार आहोत. असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला,” असं पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : Photos : “भ्रष्टाचार, घोटाळे, खंडणी”, ‘ED’ सरकारचे मंत्री असं म्हणत राष्ट्रवादीकडून १८ पैकी १७ जणांवर गंभीर आरोप

“४० दिवस झाले दाद मागायची कुठे?”

“पाऊस जोरात होता त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली. तसे डोंबिवली कल्याणमध्ये कुठेही झाले नाही. इथे सगळे तात्पुरते काम करून जातात. इथे प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाही. राज्यात मंत्रीमंडळ नव्हतं, ४० दिवस झाले दाद मागायची कुठे? ठाण्याचे मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत,” अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.