कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करून त्यातील कामातून आर्थिक लाभ मिळवण्याच्या हव्यासापोटी ८० टक्के लोक सोबत असल्याचा कांगावा करीत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी एका आंदोलनावेळी केला. संबंधित लोकप्रतिनिधींनी बाधित गावातून बैठका घेऊन शेतकरी, ग्रामस्थांचा आक्रोश जाणून घ्यावा. मगच बेताल वक्तव्य करावे, असे आव्हान दिले.

साजणी (ता. हातकणंगले ) येथील शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा शक्तिपीठ महामार्गास विरोध होत आहे. या गावात सध्या ४५० एकर जमीन शिल्लक आहे. त्यातून ३५९ शेतकऱ्यांची ९५ एकर संपादित झाल्यास ३५० एकर जमीन शिल्लक राहणार आहे. या रस्त्यामुळे गावातील ३५ टक्के अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. यामुळे आज गावातील शेतकऱ्यांनी संभाव्य महामार्गाविरोधात आंदोलन केले. शक्तिपीठ महामार्गाच्या कामात कोट्यवधी लाटण्याचा डाव असल्याचा टोला शेट्टी यांनी यावेळी लगावला.

लुटीसाठीच टीका

शक्तिपीठ महामार्गातील कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड व आजरा तालुका तसेच सावंतवाडी कोकण हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यामधून मोठमोठे बोगदे व डोंगर तसेच टेकड्या सपाट करावे लागणार आहेत. इको सेन्सिटीव्ह झोन, राखीव अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प असल्याने हरित लवादाने याठिकाणी उत्खनन करण्यास बंदी घातलेली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली बेसुमार बॅाक्साईट व गौणखनिज उत्खनन करून मौल्यवान खनिजांची तस्करी आमदार शिवाजी पाटील यांना करायची आहे. यासाठीच आमदार शिवाजी पाटील वैफल्यग्रस्त होऊन राजू शेट्टी यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी केला.

तोडपाणीवाले राजू शेट्टी अशी भाषा आमदार शिवाजी पाटील यांनी विधिमंडळात केली होती. त्याला उत्तर देताना पोवार म्हणाले, आधी आमदार पाटील यांनी आपले कारनामे आठवावे. मगच शेट्टी यांच्यावर आरोप करावेत. शिवाजी पाटील यांचा इतिहास चंदगड मतदारसंघातील जनतेला माहीत आहे. मुंबईत त्यांचे काय कारनामे चालतात, उसात ते कशासाठी लपून बसले, चंदगड सोडून मुंबईला का जावे लागले, कोणकोणत्या गुन्ह्यासाठी ते किती वर्षे तुरुंगात होते, एका हाताचे बोट का, कशासाठी तुटले, त्यांच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल झाले आहेत या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा. मगच पाटील यांच्यासारख्यांना विधान भवनात बोलण्यास उभे करावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या १० वर्षांपासून चंदगडची जनता मागणी करत असलेल्या बेळगांव -वेंगुर्ला रस्त्यावर एक पाटी मुरूम न टाकणारे आमदार पाटील गरज नसलेला शक्तिपीठ महामार्गाची मागणी करत आहेत. पाटील हे शेट्टी यांच्यावर आरोप करून वाल्याचा वाल्मिकी होण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही पोवार यांनी केली. सरपंच शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, सुनील हेरवाडे, अरूण मगदूम, जंबू चौगुले, के. डी. पाटील, पोपट पाटील, अशोक कुन्नुरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.