पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधीमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी विठ्ठलाकडे साकडे घातले.

फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी, या मागणीसाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे एकत्र आले. पांडुरंगाच्या प्रतीकात्मक मूर्तीवर अभिषेक घालून साकडे घालण्यात आले. राज्य सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास व शक्तिपीठ रद्द करण्याची सुबुद्धी सुचली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद आम्हाला दे, असे साकडे देवाला घालण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.