एकेकाळी भाजपामधील दिग्गजांची जोडी म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्यानंतर तर हा वाद आणखीच तीव्र झाला आहे. राजकीय वर्चस्व हे त्यामागचं मुख्य कारण आहे. अशातच आता एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष आणि एकनाथ खडसे यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबत आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर शनिवारी रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना दोन्ही नेत्यांमधील संघर्षाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना दोन्ही नेत्यांनी आता आरोप-प्रत्यारोप थांबवून जळगावच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – सरसंघचालक मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा; लोकसभा निकालांनंतर बैठक, अनेकांच्या भुवया उंचावल्या!

नेमकं काय म्हणाल्या रक्षा खडसे?

“गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र येऊन जळगाव जिल्ह्यासाठी काम केलं, तर त्याचा फायदा येथील जनतेला होईल. दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी मागच्या काही वर्षांपासून दोघांमध्ये संघर्ष आणि वादविवाद बघितला आहे. पण माझी इच्छा आहे, की दोन्ही नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकेकाळी हे दोघे नेते एकत्र होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यासाठी मोठं काम केलं आहे. मात्र, आता दोघांनी एकमेकांवरचे आरोप थांबवून एकत्र येण्याची वेळ आहे”, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

“पक्षप्रवेशाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील?”

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारलं असता, “एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. त्यामुळे पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय आमचे केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेते घेतील आणि वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप घडतीलच”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “भारतीय जनता पार्टीबरोबर जेवढी जास्त लोक जोडता येतील, तेवढी चांगलं आहे. त्यामुळे संघटनेची ताकद वाढणार आहे आणि एकनाथ खडसे तर भारतीय जनता पक्षाचे जुने नेते आहेत”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – ओळख नवीन खासदारांची : रक्षा खडसे, सरपंचपदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत झेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तरच जळगाव जिल्ह्याचा विकास होऊ शकतो”

“जळगावच्या विकासासाठी आता चांगली संधी आहे. गिरीश महाजन आता मंत्री आहेत, गुलाबराव पाटीलदेखील मंत्री आहेत. मी सुद्धा केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे आज अनेक मंत्री पदं या जळगाव जिल्ह्याला लाभली आहेत. सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं. तर नक्कीच भविष्यात जवळगाव जिल्ह्याचा विकास होऊ शकतो”, असंही त्यांनी म्हटलं.