सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची त्यांच्या फलटण येथील घरी साडेतीन तास चौकशी केली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चौकशीच्या वृत्तामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

गोरे यांची बदनामी करणे आणि त्यांना खंडणी मागणे या प्रकरणात एका महिलेला एक कोटी रुपये खडणी स्वीकारताना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी रामराजे यांच्यासह अन्य ११ जणांना नोटीस बजावत चौकशीसाठी वडून पोलीसांकडे हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. यातील माजी आमदार घार्गे यांनी वडूज पोलिस ठाण्यात चौकशी वकिलासह हजेरी लावली होती. तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी चौकशीसाठी मुदत मिळावी, अशी मागणी केली हेाती. तसेच आरोग्याचे कारण देऊन पोलिस चौकशीला येण्याचे टाळले होते. त्यानंतर आज वडूज पोलिस हे रामराजे यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले.

आज पोलिसांनी त्यांची साडेतीन तास चौकशी केली. त्याप्रमाणे त्यांचा जबाब या प्रकरणाचे तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी नोंदविला. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता.

रामराजेंच्या चौकशीनंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. यावर रामराजेंशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

जयकुमार गोरेंची टीकादरम्यान रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आयुष्यभर अनेक राजकीय नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा दुसऱ्याला संपविण्यासाठी खड्डा खोदतो, तेव्हा आपोआप तोच खड्डा आपल्यासाठीही तयार होतो. हीच परिस्थिती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले व्यक्त केली आहे.