शिवसेना ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. मूळ शिवसेना कोणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तर निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजुने निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना रामदास आठवलेंनी मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल, असं विधान रामदास आठवले यांनी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवलेंनी संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानाचाही समाचार घेतला. “चोर कोण आहे? ते सगळ्यांनी पाहिलं आहे. तुरुंगात कोण जाऊन आलं, हेही सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे विधिमंडळाला चोर म्हणणं, ही गोष्ट अजिबात बरोबर नाही,” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “संजय राऊत हे महाराष्ट्रात आग लावत फिरणारं कार्टं”, शहाजी बापू पाटलांची खोचक टीका!

यावेळी कविता सादर करत रामदास आठवले म्हणाले, “ते ४० जण नाहीत चोर… संजय राऊतांनी करू नये शोर… संजय राऊतांनी कितीही शोर केला तरी ते ४० आमदार हिंमतवाले आहेत. ते उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन बाहेर पडलेले आमदार नाहीत. उलट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच त्यांनी शिवसेनेतून बाहेर केलं. ते शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत.”

हेही वाचा- संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, कविता सादर करत घेतला समाचार

“निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयातही एकनाथ शिंदेंच्या बाजुने निकाल लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंची खोटी शिवसेना आहे. त्यामुळे त्यांना (उद्धव ठाकरे) आता शिवसेनेचं नाव वापरण्याचा अधिकार राहिला नाही. हा उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातला अत्यंत जबरदस्त धक्का आहे. त्याला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच जबाबदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला नसता आणि भाजपाबरोबरची युती तोडली नसती, तर उद्धव ठाकरेंवर ही नामुष्कीची वेळ आली नसती,” असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas aathwale on uddhav thackeray breaking alliance with bjp eknath shinde rebellion rmm
First published on: 01-03-2023 at 22:03 IST