रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस उद्धव ठाकरेंनी ठेवला होता असं विधान करुन खळबळ उडवून दिली. रामदास कदम यांच्या आरोपांना अनिल परब यांनी उत्तर दिलं. रामदास कदम यांनी नीचपणा केला आहे असं अनिल परब म्हणाले. तसंच जर उद्धव ठाकरेंबाबत इतका राग होता तर २०१४ मध्ये रामदास कदम यांनी सरकारमध्ये मंत्रिपद का स्वीकारलं असा सवाल अनिल परब यांनी केला. त्यावर रामदास कदम यांनी उत्तर दिलं.
अनिल परब काय म्हणाले होते?
रामदास कदम यांना बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जवळपास १५ वर्षांनी कंठ फुटला आहे. २०१४ ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर मग त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? २०१९ ला मुलाला आमदारकी घेतली. उद्धव ठाकरेंकडून सगळं मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. जर ते स्वतःला स्वाभिमानी समजतात तर रामदास कदम यांनी तेव्हाच पक्ष सोडायला हवा होता. असं अनिल परब म्हणाले. याबाबत उत्तर देताना रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा झाली ते सांगितलं.
काय म्हणाले रामदास कदम?
२०१४ मध्ये मला मंत्रिपद दिलं होतं ते कुठलं मंत्रिपद होतं? तर पर्यावरण. ते खातं किती महत्त्वाचं आहे सगळ्यांना माहीत आहे. तरीही मी शांत राहिलो. सुभाष देसाई आणि इतर दिग्गजांना महामंडळंही देण्यात आली. मला देण्यात आलं नाही. त्यावेळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो त्यांना विचारलं की तुम्ही मला महामंडळ का देत नाही? त्यावर देवेंद्र फडणवीस मला केबीनमध्ये घेऊन गेले. आमची बंद दाराआड चर्चा झाली त्यावेळी मला फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं, रामदासभाई तुम्हाला महामंडळ द्यायला उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं नाही. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना भेटलो तर ते म्हणाले हो मीच त्यांना ते सांगितलं आहे. लोक मला हसतील असं त्यांनी माझं हसं केलं.
माझ्या मुलालाही तिकिट दिलं नव्हतं ते मी मिळवलं होतं-रामदास कदम
माझ्या मुलालाही त्यांनी तिकिट दिलं नव्हतं. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम मातोश्रीवर बसले होते. पण त्याला पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. २००९ मध्ये रामदास कदमला पाडलं कुणी? अनिल परब्या तुझ्या मालकानेच मला पाडलं ना? आता का गप्प बसला आहेस? मला फक्त नामधारी मंत्री केलं होतं. योगेश निवडून आला तेव्हा अनिल परबला पालक मंत्री केलं होतं. त्यावेळीही या अनिल परबने दुजाभावच दाखवला होता असंही रामदास कदम म्हणाले.