Ramdas Kadam on Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे संपन्न झाले. यात शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला त्यादिवशीचा घटनाक्रम सांगून ठाकरेंवर आरोप केले होते. त्यानंतर आता दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्या पत्नीबाबत काही विधाने केली. त्यानंतर आता कदम यांनीही यावर प्रत्युत्तर दिले. पण ते देत असताना रामदास कदम यांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप केले आहेत.
उद्धव ठाकरे जीवाला घाबरून मला गाडीत बसवत होते
दरम्यान मी गद्दार नसून उद्धव ठाकरे गद्दार आहेत, असाही दावा कदम यांनी केला. ते म्हणाले, “नारायण राणे जेव्हा पक्षातून बाहेर पडले, तेव्हा उद्धव ठाकरे एक वर्षांपर्यंत गाडीच्या पुढच्या सीटवर मला बसवत होते. मी जर गद्दार होतो तर मला गाडीत पुढच्या सीटवर का बसवत होतात? तुमचा जीव वाचविण्यासाठी ना? आणि आज मीच गद्दार झालो. मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्हीच गद्दार झालात. सोनिया गांधींच्या पायाजवळ तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना गहाण टाकली.”
योगेश कदम वारंवार लक्ष्य
योगेश कदम यांना मंत्रिपद मिळाल्यापासून त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याकडेही रामदास कदम यांनी लक्ष वळवले. “पहिल्या टर्मनंतर त्यांना पाडण्यासाठी ठाकरे यांनी जंग जंग पछाडले तरी योगश कदम निवडून आले. त्यानंतर आता ते मंत्रिमंडळात आहेत. मात्र तरीही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप कदम यांनी केला.
अध्यक्षांवर का बरसले?
“विधीमंडळात एक आमदार मंत्र्याविरोधात आरोप करतो आणि अध्यक्ष पाहत बसतो, असे कधी होत नाही”, असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला. या आरोपावर अधिक बोलताना रामदास कदम म्हणाले, “मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर अध्यक्षांना नियम ३५ नुसार नोटीस द्यावी लागते. पण अशी नोटीस न देताही आमदारांना आरोप करण्याची मोकळीक मिळाली. सूडाच्या भावनेने योगेश कदमच्या मागे काही लोक पडले आहेत. मी अध्यक्षांची माफी मागून हे सांगतो, पण हे घडले आहे.”
अनिल परब यांनी आगामी अधिवेशनात कदम कुटुंबियांविरोधात आणखी पुरावे मांडणार असल्याचे म्हटले आहे. या विधानाला उत्तर देताना रामदास कदम यांनी वरील उत्तर दिले. पण योगेश कदम यांच्या विरोधात विधानसभेत आरोप झाले की विधानपरिषदेत? यावर रामदास कदम यांनी खुलासा केलेला नाही. पण त्यांनी अध्यक्षांचे नाव घेत आरोप केले.
अध्यक्षांनी आरोप करणाऱ्यांनी का अडवले नाही? किंवा ते आरोप कामकाजातून का काढले नाहीत? असे प्रश्न कदम यांनी उपस्थित केले.