ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही खेड येथेच सभेचं नियोजन केलं आहे. आज (रविवार) सायंकाळी पाचच्या सुमारास ही सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते रामदास कदम काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेड येथील या सभेचा शिंदे गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या सभेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रामदास कदम यांच्यावर टीकास्र सोडलं. खेड येथील सभेतून करारा जबाब मिळेल, या विधानावरून अंबादास दानवेंनी जोरदार हल्लाबोल केला.

“खेड येथील सभेतून शिंदे गट काय करारा जबाब देणार? त्यांच्याकडे तोंड दाखवायला जागा नाही आणि ते काय करारा जबाब देणार? या नुसत्या घोषणा आहेत. प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलण्याचं वाक्य आहे. त्यांच्यात करारापणाही नाही आणि जबाब देण्याची हिंमतही नाही. यांच्यामध्ये गद्दारी घुसली आहे. गद्दार माणूस कसा काय करारा जबाब देऊ शकतो?” अशा शब्दांत अंबादास दावने यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली.

हेही वाचा- “शिवसेना भवनावर चाल करून येणाऱ्या गद्दारांना…”, ही धमकी समजा म्हणत संजय राऊतांचं मोठं विधान!

अंबादास दानवेंच्या या विधानानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याविरोधात बोलशील तर याद राख… अडचणीत येशील… अशी थेट धमकी रामदास कदम यांनी दिली. तसेच अंबादास दानवेंची लफडी बाहेर काढली तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असंही रामदास कदम म्हणाले.

हेही वाचा- सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजुने लागणार?; अशोक चव्हाणांचं सूचक विधान, न्यायाधीशांच्या मतांचा हवाला देत म्हणाले…

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना रामदास कदम अंबादास दानवेंना उद्देशून म्हणाले, “तो ‘एहसान फरामोश’ (कृतघ्न) माणूस आहे. रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळेच तो विधान परिषदेत आला. याची त्याला जाणीव नाही. तो नुसती पोपटपंची करतो. त्याला कवडीचीही किंमत नाही. त्याची जर लफडी बाहेर काढली, तर त्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे मी त्याला एवढंच सांगेल की, तू आपल्या औकातीत राहा. माझ्यावर बोलशील तर याद राख… अडचणीत येशील.” अशा शब्दांत रामदास आठवलेंनी अंबादास दानवेंना धमकीवजा इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam on ambadas danve statement on eknath shinde khed rally rmm
First published on: 19-03-2023 at 14:42 IST