शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते असं विधान रामदास कदम यांनी केलं. त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे आरोप खोडले. त्यानंतर आज पुन्हा एकदा रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत असंही म्हटलं.

मातोश्रीत डॉक्टरांची टीम होती ही अनिल परब यांची माहिती खोटी-कदम

मातोश्रीमध्ये डॉक्टरांची टीम होती ही अनिल परब यांची माहिती खोटी आहे. उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी अनिल परब खोटं बोलले. लोकांच्या समोर बाळासाहेब गेले हे मी जाहीर केले होतं. जर डॉक्टरांची टीम होती तर त्यांचे नाव सांगा? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. तर अनिल परब तू का बोलतो? उद्धव ठाकरे का बोलत नाही? असा सवाल देखील रामदास कदमांनी उपस्थित केला. अनिल परबकडे किती बोगस कंपन्या आहेत. यासंदर्भात माझ्याकडे यादी आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा देखील रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिला.

अनिल परब यांच्यामुळे पक्ष फुटला-कदम

अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना अनिल परब यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केला आहे. पक्ष फुटला, सर्व लोक पक्षातून बाहेर पडले त्याला हाच चमचा कारणीभूत असल्याचा घणाघात यावेळी कदम यांनी केला आहे. परब यांनी त्यांच्या विभागात किती लोक निवडून दिली? त्यांना फक्त चुगल्या करायला आवडतात आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा अशीच माणसं आवडतात असं देखील यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

मी संशय व्यक्त केला, त्यात गैर काय?

बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत आहेत. त्यांचं पार्थिव दोन दिवस खोलीत का ठेवलं हा संशय मी व्यक्त केला आहे त्यात गैर काय? माझी मागणी योग्य असेल तर त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील होते. अनिल परब माहिती देत आहेत. पण उद्धव ठाकरे गप्प का आहेत? असाही सवाल रामदास कदम यांनी केला. मी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, ते आमचं दैवत आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मला त्यांनीच सांगितलं की मी त्यांच्या हातांचे ठसे घेऊन ठेवले आहेत.