Ramdas Kadam : दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी भाषणात एक दावा केला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि रामदास कदम यांना उत्तर दिलं. त्यानंतर आज रामदास कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंनीच त्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे त्यांनी घेऊन ठेवले आहेत. रामदास कदम यांच्यावर सुषमा अंधारे, अनिल परब आणि संजय राऊत या सगळ्यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
बाळासाहेब ठाकरेंबरोबर डॉक्टरांची टीम होती. त्यानंतर आम्ही सगळे जनतेसमोर गेलो. हे सगळं धादांत खोटं आहे. मी दाव्याने सांगतो. शेवटच्या दोन दिवसांत बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत कुणालाही जाऊ दिलं जात नव्हतं. अनिल जे बोलला ते दलाली खाऊन खोटं बोलला आहे. त्याने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. सगळे नेते आणि डॉक्टर लोकांपुढे गेले होते असं सांगितलं त्याने मनाची तरी लाज बाळगावी. मी लोकांसमोर, शिवसैनिकांसमोर गेलो. बाळासाहेब गेल्याचं मी जाहीर केलं आहे इतर कुणीही नव्हतं. डॉक्टरांची टीम होती असं अनिल सांगतोय त्याने टीमच्या लोकांची नावं सांगावीत. जर टीम होती तर मेडिकल बुलेटिन का काढलं नाही? ते कोण तुझा बाप देणार होता का? असाही प्रश्न रामदास कदम यांनी विचारला आहे. दोन दिवस डॉक्टर नव्हते. कुणालाही जाऊ दिलं जात नव्हतं, त्यामुळे मी संशय व्यक्त केला. त्यात चूक काय? उद्धव ठाकरेंचे वडील होते बाळासाहेब ठाकरे. ते का गप्प का बसले आहेत? असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले आहेत हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं-कदम
उद्धव ठाकरेंना मी एकदा म्हणालो होतो की तुम्ही बाळासाहेबांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा. कारण ते आम्हाला पूजनीय आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की त्यांनी बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले आहेत. मला हे त्यांनीच सांगितलं, त्यावेळी हा अनिल परब तिकडे नव्हताच. नार्को टेस्ट करायची असेल तर अनिल परबची करा म्हणजे किती कोटी रुपये खाल्ले, कुणाकडून गाड्या घेतल्या ते सगळं बाहेर येईल असंही रामदास कदम म्हणाले.
