Ramesh Kuthe former MLA from BJP joins Thackeray Led Shivsena : भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज (२६ जुलै) शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे यांची ही एक प्रकारची घरवापसीच आहे. कारण ते १९९५ व १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. आज त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मातोश्रीवरच त्यांचा ठाकरे गटात प्रवेश पार पाडला. उद्धव ठाकरे यांनी कुथे यांच्या मनटगावर शिवबंधन बांधलं. रमेश कुथे हे २०१८ सालापासून भाजपाबरोबर होते. मात्र आता ते स्वगृही परतले आहेत.

रमेश कुथे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ‘मातोश्री’बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील नाराजी प्रकट केली. बावनकुळे यांच्या एका वक्तव्यामुळे आमची पक्षात फसवणूक झाल्याची जाणीव झाली, असं कुथे यावेळी म्हणाले.

रमेश कुथे म्हणाले, “भाजपाच्या एका बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे आम्हाला म्हणाले होते, आपल्या पक्षात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग लागली आहे. जे येतात त्यांना होकार द्या आणि काहीजण जात असतील तर त्यांना जाऊ द्या. कारण आपण प्रत्येकालाच आनंदी ठेवू शकत नाही. येणाऱ्यांना येऊ द्या. आपल्या पक्षात १०० लोक येतील त्यावेळी पाच जण पक्ष सोडून जातील. याचा अर्थ आपला पक्ष ९५ टक्के नफ्यात आहे. बावनकुळे यांचं ते वक्तव्य ऐकून असं वाटलं की आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज मी मातोश्रीवर आलो, उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केली आणि अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपात बावनकुळे यांनी आमची फसवणूक केली आहे.” रमेश कुथे हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात.

Screenshot 2024-07-26 163423
रमेश कुथे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश.

हे ही वाचा >> Om Birla : “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नेते व आरएसएसचे पदाधिकारी ठाकरे गटात दाखल

रमेश कुथे यांच्यासह इतर अनेक भाजपा नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी ठाकरे गटात दाखल झाले. माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील आरएसएस पदाधिकारी, भाजप नेते डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ. शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैय्या जैस्वाल, वकील विष्णू मदन, भाजपा पदाधिकारी रामेश्वर फंड, भाकरवाडीचे उपसरपंच (भाजप) आसिफ पटेल, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी साजीद शब्बीर पटेल यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे देखील उपस्थित होते.