अलिबाग : कोकणात अनेक प्राचिन मंदीर आहेत. पण अलिबाग तालुक्यातील या शिवमंदीराला भेट देणे हा विलक्षण अनुभव असतो, गर्द नारळ फोफळींच्या बागात, पोखरणीच्या तीरावर वसलेले हे मंदीर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी श्रावण सोमवार या मंदीरात भाविकांची शिवमंदीरामध्ये गर्दी होत असते. चौलचे ग्रामदैवत असलेले रामेश्वर मंदीर स्थापत्य कलेचाही एक उत्कृष्ट नमुना आहे. कोकणातील सर्वात देखणे शिवमंदीर म्हणूनही या मंदीराची ओळख आहे.

चौल हे एक प्राचीन काळापासून एक मोठे व्यापारी शहर व बंदर असल्याची नोंद सापडते. चौल बंदरातून इजिप्तपर्यंत व्यापारी माल पाठविला जात असे. पुराणकाळात रेवती खंड आणि चौल चंपावती नगरी म्हणून ओळखला जाणारा आज हा परिसर चौल म्हणून ओळला जातो. गावातील १५ पाखाडयापैकी भोरसी पाखाडीत चौलचे ग्रामदैवत श्री रामेश्‍वर मंदिर आहे. चौलचे श्री रामेश्‍वर मंदिर चारशे वर्षापुर्वीचे असावे असा अंदाज बांधण्यात येतो. इटालियन प्रवासी डेलाव्हॅली यांनी या मंदिरास इ.स.१६२५ साली भेट दिली होती. त्यावेळी सदर मंदिराचा उल्‍लेख अतिशय पुज्यनिय मानलेले देवालय असा केला आहे.

श्री रामेश्‍वर हे स्वयंभू देवस्थान असल्याने तेथे त्या काळी गावकर्‍यांनी सर्व साधारण घुमट बांधलेली नोंद सापडते. तसेच आजूबाजूचे मंदिर हे गवताचे,छपराचे शाकारलेले असल्याचे नोंद ग्रुपग्रामपंचायत चौल दत्परी असेंसमेंट 567 ने आजमितीस आहे हे विशेष होय. परंतू हे मंदिर कोणी व केव्हा बांधले यांचा उल्‍लेख मिळत नाही. पण मंदिराची दुरूस्ती अनेकदा झाल्याचे आंगरेकालीन उल्‍लेख आहे. ऑक्टोबर १७४१ रोजी विजयादशमीच्या मुर्हूतावर श्री भगवान स्वरूप श्रीनिवास दिक्षीतबाबा नावाच्या गृहस्थाने या मंदिराचा जिर्णोध्दार केला. त्यासाठी लागलेले द्रव्य नानसाहेब पेशवे आणि मानाजी आंग्रे यांनी पुरविले. मात्र त्यांचे हातून काम पुरे झाले नव्हते. कपलात करणे, रंग देणे, इत्यादी किरकोळ कामे राहिली ती विसाजीपंत सरसुभेदाराने १७६९ मध्ये पुरी करून नंदीजवळ दीपमाळ आणि तुळशी वृंदावन बांधले. मार्च १८१६ मध्ये रामेश्‍वर मंदिराचा नंगारखाना बांधण्याचे काम सुरू झाले. मंदिरासमोरील पुष्करणीाची दुरूस्ती १९३८ मध्ये झाली.

रामेश्‍वर मंदिराजवळ आणखीन दोन लहान मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला रामेश्‍वरला पाच दिवस यात्रा भरत असे. मंदिराला देणग्या देण्याची पूर्वापार पद्धत आढळते. रामेश्‍वराच्या मुर्तीसमोर सभागृहात अग्‍निकुंड,उत्‍तरेस नारायणाच्या मुर्तीसमोर कमानीखाली पर्जन्यकुंड आणि दक्षिणेस गणपतीच्या मुर्तीसमोर वायु कुंड आहे. ज्यावेळी हवेतील उष्मा नाहिसा होतो त्यावेळेस अग्‍नीकुंड उघडतात, वारा पडतो तेव्हा वायुकूंड उघतात, आणि पाऊस पडत नाही तेव्हा पर्ज्यन्यकुंड उघडतात. कुंडाच्या वैदिका पुर्वी बर्‍याच खाली होत्या. सन 1741 मध्ये मंदिराचा जिर्णोध्दार केला. तेव्हा जमीन चढविली व वेदिकेची वर बांधणी करून कुंडाची मुळची उंची वाढवली. पर्जन्य कुंड उघडल्याचे बरेच जुने दाखले मिळतात. जुन 1731 मध्ये पर्ज्यनवृष्टी व्हावी म्हणून येसांजी आंग्रे यांनी पर्जन्य कुंड उघडल्याचा दाखला मिळतो.

हे मंदिर पुर्वाभिमुख आहे. असलेल्या रामेश्‍वर मंदिराचा गाभारा सुमारे 4.42 बाय 4.42 मीटर असून मध्यभागी 1.50 मीटर लांब रूंद व जमीनीपासून थोडी उंच पितळी पत्राचे मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंची लिंग नसून चौकोनी खड्डात स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे.

मंदिर परिसरात मंदिरासमोर नंदी असून त्यावर एक भव्य मोदकाकृती दीपमाळ आहे. समोरील तुळशी वृंदावना जवळ एक छोटी दिपमाळा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व त्रिपुरा पौर्णिमेचे दिवशी मंदिरात दिपोत्सव साजरा केला जातो.

श्री रामेश्‍वर मंदिरात श्रावण पहिला सोमवार ते दुसरा सोमवार अखंड हरिनाम सप्ताह असतो सप्ताहाची समाप्ती झाल्यावर श्री रामेश्‍वराचा छबिना निघतो तसेच महाशिवरात्र व त्रिपौर्णिमेच्या दिवशी रात्री श्री चा छबिना असतो. मंदीराला भेट देणे हा विलक्षण अनुभव असतो, निसर्ग रम्य परिसरात वसलेल्या या मंदीर श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. मुंबई गोवा महामार्गाने अलिबाग मार्गे चौल येथे पोहचता येते. तर सागरी मार्गाने मुंबईतून मांडवा अलिबाग येथे पोहोचून नंतर चौल येथे जाता येते.