रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवाती पासून सुरु झालेला पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २ हजार २१३.०७ हेक्टरी क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. ऑक्टोबर महिन्या पर्यत जिल्ह्यातील १० हजार ८२ शेतक-यांना या पावसाचा फटका बसला आहे. सर्वांचे पंचनामे कृषी विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसाने यावर्षी जिल्ह्यातील मुक्काम वाढविला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरीही पाऊस जाण्याचे नाव नसल्याने जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी वर्ग चांगलाच हवालदील झाला आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अशा पावसाचा मोठा फटका येथील १० हजार ८२ शेतक-यांना बसला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील एकूण २ हजार २१३.०७ हेक्टरी क्षेत्र बाधित झाले आहे. या क्षेत्रामध्ये भात पीकाचे सर्वात जास्त म्हणजे हेक्टरी २१०२ क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच नाचणी पिकाचे १०४.२६, फळ पिकांचे १.०९, भाजीपाला क्षेत्राचे ४.९१ हेक्टरी क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १८७.९२ लाख एवढे भात, नाचणी आणि इतर फळ पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ५५ हजार ५५१ हेक्टर क्षेत्रावर भात, नाचणी पिकांची पेरणी करण्यात आली होती. त्यात सर्वात जास्त भात पिकांची पेरणी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडणा-या परतीच्या पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास हिरावून घेतला. जिल्ह्यातील पावसाचा भात पिकांना मोठा फटका बसल्याने उभी भात पिके आडवी झाली. १ ते ३१ ऑक्टोबर या एका महिन्यात २ हजार २१३ हेक्टरवर भात पिकांचे नुकसान झाले. तर चार महिन्यात तब्बल २६७ हेक्टरवरील पिके पावसाच्या पाण्याने उध्दवस्त झालीत.

रत्नागिरी जिल्ह्यात पाच महिन्यात एकूण २ हजार २१३ हेक्टर क्षेत्र व १० हजार ८२ शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे. या नुकसान ग्रस्त भागांपेकी आतापर्यंत ९६५.१ क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच ४ हजार ८६९ शेतकऱ्यांचे १२४८.६ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

नुकसान ग्रस्त शेतक-यांचे पिकांचे व क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आले आहेत. पंचनामे पुर्ण होताच, येणारी नुकसाई भरपाईचे देखील वाटप करण्यात येणार आहे. शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नगिरी