रत्नागिरी : बँकेत कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे, जर बँकेचा शाखाधिकारी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिवेशन काळात वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक, बागायतदार यांच्या अडी-अडचणी संदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, सिबील स्कोर मागून बँका जर त्रास देत असतील तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना मिळवून देण्यासाठी तसेच जे साडे चार कोटी रुपये परत गेले आहेत, त्यासाठी देखील वित्तमंत्री अजित दादांकडे एकत्रित बैठक घेतली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
या बैठकीला सहकार मंत्र्यांनाही निमंत्रित करुन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर पालकमंत्र्यांनी सांडे लागवण व काळबादेवी गावातील भू संपादनाबाबत रेवस रेड्डी महामार्गाबाबत, जेएसडब्ल्यू व कॉफिडन्स गॅसबाबत आणि ट्रक टर्मिनलच्या अडी-अडचणी संदर्भात बैठक घेवून योग्य त्या सूचना या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.