रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे मौज मज्जा करण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका तरुणाचा खोल समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात यश आले आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेल्या तरूणाचे नाव प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६) रा. मानखुर्द मुंबई असे आहे. तसेच भीमराज आगाळे (वय वर्षे २४) राहणार कल्याण मुंबई आणि विवेक शेलार (वय वर्षे २५) राहणार विद्याविहार मुंबई, या दोघांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक, जीवरक्षक, पोलीस व ग्रामस्थांना यश आले.
मुंबई येथून आदर्श धनगर (२६) राहणार गोवंडी मुंबई, प्रफुल्ल त्रिमुखी (२६) राहणार मानखुर्द मुंबई, सिद्धेश काजवे (२५)राहणार परेल लालबाग मुंबई, भीमराज आगाळे(२४) राहणार कल्याण मुंबई व विवेक शेलार (२१) राहणार विद्याविहार मुंबई,असे कॉलेजचे मित्र असणारे पाच तरुण देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे शुक्रवारी सकाळी आले होते. हे पाच तरुण गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉज मध्ये निवासासाठी उतरले होते. या तरुणांनी दुपारनंतर समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी समुद्रस्नान करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. यात ते बुडू लागले. यावेळी इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात जावून तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले.
त्यांना तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता प्रफुल्ल त्रिमुखी हा मृत झाल्याचे घोषीत केले. तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना शुद्धीवर आणून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तर मयत झालेल्या प्रफुल्ल त्रिमुखी याचे शवविच्छेदन करण्यासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. याविषयी मयत झालेल्या प्रफुल्ल त्रिमुखी याच्या कुटूंबियांना या घटनेबाबत कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
