Ravindra Dhangekar post : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) आणि भाजपा या दोन पक्षात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान धंगेकरांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केला असून याबरोबर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही, असे धंगेकर म्हणाले आहेत.

शिवसेना (शिंदे) पक्षात असलेल्या धंगेकरांनी महायुतीतील बड्या नेत्यावर आरोप केल्याने त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यादरम्यान धंगेकरांनी पोस्ट करत एकनाथ शिंदे अशी कारवाई करणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे,” असे धंगेकर म्हणाले आहेत.

तसेच कितीही किंमत मोजावी लागली तरी आपण मागे हटणार नसल्याचे धंगेकर पुढे म्हणाले आहेत. “आणि पुन्हा एकदा सांगतो….. भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..!” असे त्यांनी पुढे लिहिले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

पुण्यातील मॉडेल कॉलनी भागातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या सेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदा गोखले कन्स्टक्शनला विकल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला होता. या जागा विक्री प्रकरणात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोपही होत आहे. त्याविरोध जैन समाजाने शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. जैन समाजाच्या या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही पाठिंबा दर्शविला होता. या जागा विक्री करणाचे तीव्र पडसाद शहरात उमटत असून मोहोळ यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.