मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे ४० हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील हे देखील आहेत. त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली आहेत. शरद पवार हे गोड बोलून काटा काढतात, तर अजित पवार सूडाचं राजकारण करतात, असं विधान त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलं आहे. संबंधित ऑडिओ क्लिपची पुष्टी लोकसत्ता करत नाही.

शरद पवारांबाबत बोलताना व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शहाजी बापू पाटील म्हणाले, “पवारसाहेबांना कसं विसरेल, ते मैद्याचं पोतं, बारामतीचा ममद्या आहेत. शरद पवार हे शरद पवार आहेत. ते एक गोष्ट गोड बोलतात पण काटा काढल्याशिवाय राहत नाहीत. त्यांनी सेना संपवण्यासाठीच उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलंय. प्रेमानं अजिबात केलं नाही, रागात केलंय. उद्धव ठाकरे भाजपाबरोबर गेले, तर हा माणूस भविष्यात मोठा होईल, त्यांना आताच आवळून टाका, सेना संपवून टाका, संधी सापडलीय. असलं पवारसाहेबांचे राजकारण असतं. ते आमच्यासारख्यांनी ओळखलं. ते राजकारणात जगाला गंडवतील पण आपल्याला उभ्या आयुष्यात गंडवू शकणार नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या तालिमीत तयार झालेली अवलाद आहे आपण.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी संजय राऊत आणि अजित पवार यांच्याबाबत देखील वादग्रस्त विधानं केली आहेत. संजय राऊतांबाबत बोलताना ते म्हणाले की, “संजय राऊत नुसतं घाणा घालतात. भावाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते शपथविधीच्या कार्यक्रमात रागात बोलत होते. शपथविधीतून ते पहिल्यांदा निघून गेले. भावाला मंत्रीपद मिळालं नाही, म्हणून सूड उगवत आहेत. संजय राऊत हा शरद पवारांचा मॅचफिक्स माणूस आहे,” असंही ते म्हणाले.