सांगली : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भीमेच्या मदतीला कृष्णा धावली असून, सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यातून ५ यांत्रिक बोटी व ४५ लाईफ जॅकेटसह १५ व्यक्तींचे पथक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत सोलापूरकडे रवाना झाले.

अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे सीना कोळेगांव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातील अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशा परिस्थितीत सीना नदीकाठावरील तसेच लगतच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने करमाळा, माढा, मोहोळ, अपर तहसील मंद्रूप, उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अतिरिक्त मनुष्यबळ व साहित्याची मागणी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे उपलब्ध साहित्यांपैकी आवश्यक त्या साधन सामुग्रीसह व पाण्याच्या खाली शोधकार्य करण्याच्या क्षमतेसह तैनात करण्यासाठी ५ यांत्रिक बोटी, सोबत १५ व्यक्तींचे पथक व ४५ लाईफ जॅकेट, ५ रबरी रिंग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

​सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत घुसून मासेमारी करणाऱ्या कर्नाटकच्या ‘हायस्पीड ट्रॉलिंग’ नौकेवर कारवाई: अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सांगलीतून मदत पथक

 मिरजेतून १० लाखाची मदत

दरम्यान, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी मिरज विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा लाखांचा धनादेश आमदार सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.

मराठवाड्यासह मध्य व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. तर अतिवृष्टीमुळे हजारो घरे पाण्याखाली आहेत. शेतात पाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, लातुर, धाराशीव, बीड, जालना यांसह आसपासच्या जिल्ह्यात ११० गावांत पावसाने थैमान घातल्याने येथील जनजीवन ठप्प झाले आहे.

मिरज विधानसभा क्षेत्रातून या जिल्ह्यासाठी धान्य, कपडे, औषधे व जनावरांसाठी चारा पाठविण्याची तातडीने व्यवस्था करणार असल्याचे आ.डॉ. खाडे यांनी सांगितले. तसेच सांगली मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध सामाजिक संस्था, दानशुर व्यक्ति, संघटना व नागरिक यांनी या पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्यास पुढे यावे, असे आवाहनही आ. खाडे यांनी केले.