नांदेड : ऑगस्टमधील ‘मघा’ नक्षत्रापासून तडाख्यांवर तडाखे देणार्‍या पावसाने ‘हस्त’ नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील उरलेसुरले पीक जमीनदोस्त करत तडाखेबंद सलामी दिली. शुक्रवारची सायंकाळ ते शनिवारच्या सकाळपर्यंत जिल्ह्यातील २५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सर्वदूर झालेल्या पावसामुळे नांदेड शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांतील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यासाठी शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. एकंदर अनुमान काढून प्रशासनाने शाळा-महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांना आधीच सुट्टी जाहीर करून टाकली होती. जिल्ह्याच्या बर्‍याच भागात शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेणार्‍या पावसाने सायंकाळ ते शनिवारच्या सकाळपर्यंत ‘हस्ता’चे वाहन असलेल्या मोराच्या नजाकतदार थयथयाटाच्या विपरित सर्वत्र ‘टपटपाट’ केल्याचे दिसले. अनेक भागांत मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत धोधो पाऊस झाला.

बहुतांश भागात शनिवारची सकाळ जलधारांनीच उगवली. त्यानंतर समाजमाध्यमांतून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील विदारक, दारुण आणि चिंताजनक स्थितीची माहिती समोर येऊ लागली. मागील चार दिवसांपासून विष्णुपुरी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सुसाट झेपावल्यामुळे शहरातील नदीकाठचा भाग आणि जिल्ह्यातील नदीकाठची अनेक गावे बाधीत झाली. वरील प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडे असून दूपारपर्यंत त्यांतून १ लाख ८० हजार क्युसेक प्रवाहाने नदीपात्रात पाणी सोडले जात होेते. वरून होणारी आवक लक्षात घेता शनिवारी रात्रीपर्यंत नांदेड शहरात गोदावरी नदीतील पाणी ३५४ मीटर ही धोकापातळी ओलांडण्याची शक्यता मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यक्त केली आहे.

नांदेड जिल्ह्याशी संबंधित इसापूरच्या धरणाच्या ९ दरवाजांतून पैनगंगा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. कंधार-लोहा भागातील ऊर्ध्व मानार प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे अनेक भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतरच्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. सकाळपासूनच बचावकार्याची यंत्रणा कार्यरत झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही भयावह परिस्थिती आहे. नांदेड-हैदराबाद या प्रमुख मार्गांसह जिल्हाभरातील अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह महसूल, पोलीस आणि मनपा प्रशासनाची यंत्रणा सकाळपासून कार्यरत झाली.

कंधार तालुक्यात एकाचा मृत्यू

कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून पांडुरंग निवृत्ती कदम (वय ४७) या शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी शेतातून घरी येत असताना गावाजवळच्या रस्त्यावर अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यंदाच्या नैसर्गिक आपत्तीतील हा २७वा बळी असल्याचे सांगण्यात आले.

वीज कोसळून सिलिंडरचा स्फोट

शहराच्या दुल्हेशाह रहमान नगर भागातील एका कुटुंबाच्या घरामध्ये गोदावरी नदीचे पाणी शिरल्यामुळे हे कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले होते. शनिवारी पहाटे त्यांच्या घरावर वीज कोसळल्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील सामान तसेच लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले. पेेंटर व्यवसायातील सर्फराज हुसैन हे या कुटुंबाचे प्रमुख असल्याचे सांगण्यात आले.

मुखेड तालुक्यातील भवानी तांडा येथील शेतकरी जयराम धनाजी पवार यांच्या ३५ शेळ्या शुक्रवारी सायंकाळनंतर पाण्यामध्ये वाहून गेल्या. या सर्व शेळ्यांना चरण्यासाठी नेण्यात आले होते. परतीच्या वाटेवर जोरदार पावसामुळे त्या भागातील ओढ्याला आलेल्या पुरामध्ये या सर्व शेळ्या वाहून गेल्यानंतर तहसिलदारांनी घटनास्थळास भेट दिली.