“राज ठाकरेंना कळकळीची विनंती, अमित ठाकरेंकडे ‘मनविसे’चं अध्यक्षपद द्यावं”

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं ट्विट

Ameya Khopkar MNS
विद्यार्थ्यांसमोर सध्याचा काळ मोठा कठीण आहे आणि त्यासाठीच नेतृत्वही तितकंच खंबीर हवं, असंही अमेय खोपकर म्हणाले आहेत.(संग्रहीत छायाचित्र)

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा एकप्रकारे धक्का मानला जात आहे. तर, आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे सोपवली जावी, अशी मागणी मनसेच्या नेते व पदाधिकाऱ्यांमधून समोर येऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक ट्विट करत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळकळीची विनंती केली आहे.

“विद्यार्थ्यांसमोर सध्याचा काळ मोठा कठीण आहे आणि त्यासाठीच नेतृत्वही तितकंच खंबीर हवं. राजसाहेब ठाकरे यांना मनापासून विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद आता अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात यावं. राज्यातल्या तमाम विद्यार्थ्यांच्यावतीने ही कळकळीची विनंती.” असं अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नजीकच्या काळात मोठी राजकीय जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. सध्या मनसे नेतेपद असणाऱ्या अमित ठाकरे यांच्याकडेच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आदिक्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच जोरदार चर्चा सुरू असताना आता खुद्द अमित ठाकरे यांनी देखील तसे संकेत दिले आहेत.

“मला कालपासून फोन येत आहेत…”, मनविसेच्या अध्यक्षपदाबाबत अमित ठाकरेंनी दिलं सूचक उत्तर!

अमित ठाकरे नाशिकमध्ये असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावरू भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याबद्दल अमित ठाकरेंना पत्रकारानी विचारणा केली. त्यावर सूचक शब्दांमध्ये अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. “सगळ्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलोय. कालपासून मला फोन येत आहेत की तुम्ही ही जबाबदारी घ्या. साहेब जी जबाबदारी देतील ती पार पाडेन. त्यांनी नेतेपदाची जबाबदारी दिली, त्या पदाला जितका शक्य होईल तितका न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पुढे देखील जी जबाबदारी दिली जाईल ती मी घ्यायला तयार आहे”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Request to raj thackeray to give the chairmanship of maharashtra navnirman vidyarthi sena to amit thackeray ameya khopkar msr