सातारा : सातारा पालिकेच्या २५ प्रभागांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. प्रभाग क्रमांक ७, १४, २० आणि २२ या चार प्रभागांमध्ये खुल्या प्रवर्गाची आरक्षणे जाहीर झाल्याने येथे जोरदार मोर्चेबांधणी पाहायला मिळणार आहे. याशिवाय इतर मागास प्रवर्गासाठी १४ प्रभाग तर अनुसूचित जातीसाठी सहा व जमातीसाठी एक प्रभाग आरक्षित करण्यात आला आहे. साताऱ्याचे प्रांत आशिष बारकुल व पालिका प्रशासक अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात आली. अभिजित बापट यांनी आरक्षण सोडतीची माहिती दिली. निवडणूक निरीक्षक मोहन प्रभुणे यांनी सोडतीची प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडली.
नगरपालिका शाळेतील मुलींच्या व मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. प्रथम नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण १४ प्रभाग या प्रवर्गासाठी सुरुवातीला आरक्षित झाली. सोडतीद्वारे ५, ६, १०, ११, १८ व २४ हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर १२, १६, १७, १९, २३, व २५ या प्रभागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षण पडले. प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आला होता. या प्रभागात महिला उमेदवाराला लॉटरी लागली असून, यंदा देखील या प्रभागातून महिला उमेदवारालाच प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रभाग दोन, तीन, चार, आठ, तेरा, व पंधरा हे सहा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून, यापैकी ४, ८, १३ हे प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. या आरक्षण सोडतीनंतर नगरसेवकांमध्ये कही खुशी कही गम, अशी परिस्थिती निर्माण झाली. काहींची अपेक्षापूर्ती झाली, तर काहींचा भ्रमनिरास झाला आहे. येत्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी या प्रभाग आरक्षणानंतर घडणार आहेत. उमेदवारी जाहीर करताना खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वसमावेशक उमेदवार द्यावा लागणार आहे. आरक्षण सोडत प्रक्रिया सुमारे दोन तास सुरू होती.
अभिजित बापट हे प्रत्येक टप्प्यावर आरक्षण प्रक्रियेची माहिती देऊन त्यानुसार नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येत होती. प्रभाग क्रमांक ७, १४, २० आणि २२ या चार प्रभागांत सर्वसाधारण आरक्षणे पडली आहेत. त्यामुळे सर्वांत जास्त चुरशीचे सामने या चार प्रभागांत पाहायला मिळणार आहेत. सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना राजकीय संवेदनशीलता लक्षात घेऊन येथे उमेदवार द्यावे लागणार आहेत. नगराध्यक्ष आरक्षण पद ही सर्वसाधारण खुले पडल्यामुळे बहुतांश नगरसेवक हे थेट नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असणार आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाकडे अनेकांचा कल कमी असून, आपणच काम केल्याचा दावा करत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे अनेक जणांनी सांगितले आहे. शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर या हद्दवाढीतील नव्या भागांचा आरक्षित प्रभागात समावेश झाल्याने हद्दवाढ भागातही मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे.