मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाळ्या आधी होणाऱ्या नालेसफाई कामाची झाडाझडती घेण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. त्यानंतर राजकारणाला ऊत आला आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. तसेच पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईतील कामांबाबत माहिती दिली. पत्रकारांनी आशिष शेलार यांनी केलेल्या ट्वीटबद्दल त्यांना सांगितलं असता. त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. टीका सोडून जर चांगल्या सूचना दिल्या तर आणि त्यावर विचार करू असा टोलाही त्यांनी लगावला.”मी टीका करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही. टीका, आरोप होत असतात. पण या व्यतिरिक्त त्यांना काही चांगलं सुचलं आणि त्यांनी सूचना दिली तर नक्कीच आम्ही विचार करु.” अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला.

दुसरीकडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करत मुंबईतील मान्सूनपूर्व कामावर टीका केली होती. “भाजपाने नालेसफाईच्या कामाची दुसऱ्यांदा झाडाझडती घेण्याचा आजचा कार्यक्रम काल दुपारी ठरवला…संध्याकाळी घोषित केला…पालकमंत्र्यांना कळताच काल संध्याकाळी म्हणे त्यांनी कामांची धावती पाहणी केली.. एवढे दिवस कुठे होतात? सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार!” असा शब्दात सुनावलं होतं.

आशिष शेलार यांनी लगेचच दुसरं ट्वीट केलं. “नालासफाईच्या पोलखोल दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला आज आम्ही सुरुवात केली. मालाड (प.) येथील वळनाई नाला येथे पाहणी करणार असे कळताच कंत्राटदारांची तारांबळ उडाली खरी पण गाळाचे ढिगारे नालेसफाईतील लबाडीची पोलखोल करीत असल्याचे चित्र पहायला मिळते.”, असं त्यांनी यावेळी ट्वीट केलं आहे.