कराड : विनाकारण कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये. पुसेसावळीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, अशा घटना घडणे हे राज्यकर्त्यांचे अपयशच असल्याची टीका करताना, याबाबत सरकारला जाब विचारू अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
खटाव तालुक्यातील पुसेसावळीत गेल्या रविवारी (दि.१०) रात्री प्रार्थनास्थळावर हल्यासह जाळपोळ, मोडतोड होताना त्यात नूरहसन शिकलगार या तरुणाचा मृत्यू झाला होता. चव्हाण यांनी नूरहसनच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. चर्चाही केली. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे कार्यकर्ते, गावपुढारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा >>> शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी!, आठ महिन्यांमध्ये विदर्भ अन् मराठवाड्यात…
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पोलिसांनी सतर्क राहून अशा घटना रोखणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष कायम अन्यायग्रस्तांच्या पाठीशी असेल. शांतताप्रिय पुसेसावळीला क्रांतीवीरांचा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढ्यात इथल्या सुपुत्रांनी रक्त सांडले आहे. तरी गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची असल्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. नूरहसन शिकलगार याच्या पत्नीने ‘हमारा देश तो सिक्युर है, फिर भी क्या अभी नमाज पडना भी गुनाह है’ असा प्रश्न या वेळी उपस्थित केला. मशिदीमध्ये नमाज पठण करणारा आमचा माणूस घरी परत येईल का नाही अशी भीती वाटत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.