देश सध्या करोना विषाणूशी लढा देत आहेत. देशाच्या जवळपास सर्वच राज्यात करोनाचा कहर सुरुच आहे. त्यापैकी काही राज्यांमध्ये करोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाढती करोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली असून राज्यांना करोनाशी लढण्याचा कानमंत्रही दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, आधी तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की, ज्या राज्यांमधून करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे.


देशातले ८० टक्के करोनाबाधित हे याच सहा राज्यांमधले आहेत. तसंच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचंही ते म्हणाले.

आणखी वाचा- Corona Vaccine: मोदी सरकारने दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; तब्बल ६६ कोटी डोस होणार उपलब्ध

ते पुढे म्हणाले, ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करुन करोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. कारण जसंजशी रुग्णवाढ होते, तसतसा हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे.

करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबद्दल ते म्हणतात की, करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण आधी ही रणनीती अवलंबली आहे. आत्ताही आपल्याला तेच करायचं आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस…याच रणनीतीच्या आधारावर आपल्याला पुढे जायचं आहे. तसंच ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवं तसंत मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर करोनाशी लढण्याचं एक अस्त्र म्हणून करायचा आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या २३ कोटींच्या करोना पॅकेजचा वापर वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्यासाठी करायला हवा असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rise in covid 19 cases in maharashtra is the matter of worry aid pm narendra modi vsk
First published on: 16-07-2021 at 12:25 IST