पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. परंतु संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं होतं, असं म्हणत देशातल्या २० विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी या कार्यक्रमावरून सरकारवर टीकाही केली आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय जनता दलनेदेखील या कार्यक्रमावर टीका केली आहे. तसेच संसदेच्या नव्या इमारतीची थट्टा उडवली आहे.

लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलने देशाच्या नव्या संसद भवनाची तुलना शवपेटीशी केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिला फोटो शवपेटीचा तर दुसरा फोटो नव्या संसदेचा आहे. राजदने “हे काय आहे?” असा प्रश्न कॅप्शनमध्ये उपस्थित केला आहे

दरम्यान, या ट्वीटनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राजदवर पलटवार केला आहे. सुशील मोदी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. याद्वारे त्यांनी राष्ट्रीच जनता दलावर निशाणा साधला. तसेच शवपेटीवाल्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा >> ”देशात राज्यसभा आहे की नाही?” नव्या संसदेच्या उद्घाटनावरून सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला प्रश्न; म्हणाल्या, “कार्यक्रमाला गेलो असतो, पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुशील कुमार मोदी म्हणाले की, राजदचे खासदार आता राजीनामा देणार का? संसदेची तुलना शवपेटीशी केल्याबद्दल राजदवर देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा. राजदच्या या ट्वीटवरून त्यांची मानसिकता दिसते. हा पक्ष नेहमीच देशाचा अपमान करत आला आहे. राजदने जे दोन फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी दुसरा फोटो म्हणजेच भारतीय संसदेचा फोटो हे भारताचं भविष्य आहे आणि पहिला फोटो म्हणजेच शवपेटीचा फोटो हे राजदचं भविष्य आहे.