अठराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीने ३० तर महायुतीने केवळ १७ जागा जिंकल्या आहेत. या अपयशामुळे महायुतीतील सर्वच पक्ष बॅकफूटवर ढकलले गेले आहेत. अशातच आता शिवसेनेच्या शिंदे गटातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतील भवितव्याबाबत चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, अजित पवार गटातील आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जात आहेत. शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की अजित पवारांच्या गटातील १८ ते १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत.

रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांचे १९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु, या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. आमचं त्यांना (शरद पवार) एकच सागणं आहे की, पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले त्यांनाच पहिलं प्राधान्य द्यायला हवं. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरं प्राधान्य द्यावं. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं.”

यावेळी रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, युगेंद्र पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार का? यावर रोहित पवार म्हणाले, “कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाचं तिकीट नाकारायचं याचा निर्णय केवळ शरद पवार घेतात. त्यामुळे हा प्रश्न शरद पवारांना विचारावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते बाळासाहेब पाटील, जयंत पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आमचे शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील.”

हे ही वाचा >> विश्वचषक मोहिमेस प्रारंभ! भारताची आज आयर्लंडशी सलामी; रोहित-कोहली जोडीकडे लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार म्हणाले, “येत्या काळात विधानसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशची जबाबदारी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावर टाकली तर तिथले कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संगन्मत ठेवून त्या भागात आमचे जास्त आमदार कसे निवडून आणता येतील यावर काम करेन.”