राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. तेव्हापासून दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सातत्याने पक्षाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. शरद पवारांचं वय आणि त्यांच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य करत आहेत. तर शरद पवारांच्या गटातील नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना दिसत आहेत. दरम्यान, रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक कथित व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अजित पवार यांच्या एका सभेतला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या सभेत मंचावर अजित पवार बोलत आहेत. मात्र सभेला फारशी गर्दी झालेली दिसत नाही. सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात अनेक ठिकाणी रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत. तर काही जण सभा सोडून निघून जात असल्याचं दिसत आहे. रोहित पवार यांनी या व्हिडीओला 'अतिशहाणा त्यांचा मंडप रिकामा' असा मथळा (टायटल) दिला आहे. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, "या भाषणापेक्षा डोंबाऱ्याच्या खेळाला जास्त गर्दी असते!" व्हिडीओसह #MoyeMoye हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हिडीओमध्येदेखील हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत आहे. हा व्हिडीओ शेअर करून रोहित पवारांनी अजित पवारांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे ही वाचा >> “लातूर, चंद्रपूर, अमरावतीतले दिग्गज महायुतीच्या वाटेवर”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “अशोक चव्हाण दोन दिवसांत…” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या भाषणादरम्यान शरद पवार यांना उद्देशून केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. याच वक्तव्यावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. “आम्हाला माहीत असलेले अजित पवार आणि आताचे अजित पवार हे फार वेगळे आहेत. केवळ भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांच्याकडून सुरू असून आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती त्यांच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून येऊ शकतो “ असं रोहित पवार म्हणाले.