अहिल्यानगर: रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी व साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. पोलीस तपासात हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

मोर्चात पक्षाचे पदाधिकारी विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव, किरण दाभाडे, अजयराव साळवे, सुरेंद्र थोरात, दीपकराव गायकवाड, अमित काळे, भीमा बागुल, लॉरेन्स स्वामी, अविनाश भोसले, राजू बडे, राजू जगताप, बाबा राजगुरू, आदिनाथ भोसले, विजय भांबळ, संजय कांबळे, ज्योती पवार, आरती बडेकर, युवराज गायकवाड, पप्पू बनसोडे, राजू नाना गायकवाड, सतीश मगर, धनंजय निकाळे, विजयराव खरात, कैलास कासार, अनिल नलावडे, विवेक भिंगारदिवे, विलास साळवे, सुरेश भागवत, प्रदीप लोखंडे, गौरव मगर, अमोल आहेर, राकेश गरुड, महेश अंगारखे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जामखेड तालुक्यातील नानज गावामध्ये गुंडांची टोळी कार्यरत असून, गावात दहशत निर्माण करणे, नागरिकांना मारहाण करणे, दुकानदार व वाहनचालकांकडून खंडणी उकळणे असे गुन्हे करत आहे. याच टोळीतील गुंडांनी दि. २९ जूनला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला. त्याच्या निषेधार्थ साळवे यांनी गाव बंद केले होते. याचाच राग मनात धरून साळवे यांच्या कुटुंबीयांवर तलवार, कोयते, लोखंडी रॉडसह जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये यशदीप साळवे, रतन साळवे, आदेश साळवे, रेश्मा साळवे, दिग्विजय सोनवणे जखमी झाले आहेत.

अभिजित साळवे यांच्यावर शस्त्राने वार करून बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करून घटनेच्या सूत्रधाराचा शोध घ्यावा, कटकारस्थानाचे कलम लावावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. गुन्ह्यातील काही आरोपी अटकेत असले तरी काही अजूनही गावात मोकाट फिरत आहेत, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विविध टोळ्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्याला राजकीय पाठबळही मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी गोळीबार करत दुहेरी हत्याकांडासारखा प्रकारही घडला. या टोळ्यांचा पोलिसांनी बीमोड करावा, अशीही नागरिकांची मागणी आहे.