आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत-अशोक चव्हाण

दोन पक्षांचं सरकार चालवताना समन्वय महत्त्वाचा असतो

संग्रहित

आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. ‘लोकसत्ता‘तर्फे आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या वेबसंवादात अशोक चव्हाण सहभागी झाले होते. या वेबसंवादात त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण? 

“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे, हे मी अनुभवलं आहे. कारण काँग्रेस पक्षाचंही महत्त्व टिकलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगलं स्थान दिलं गेलं पाहिजे. दोहोंचा समन्वय घडवून हे सरकार चालवलं जातं. मी त्याचा अनुभव घेतला आहे. मी मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला कंट्रोल केलं असं म्हणणार नाही. मात्र मी काँग्रेसचं संख्याबळ टिकवण्याचं, पक्षाला बळकटी आणण्याचं काम केलं. ” असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेस पक्षाचे आमदार जास्तीत जास्त निवडून कसे येतील यावर लक्ष केंद्रीत केलं. मी मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ, नारायण राणे, अजित पवार हे सगळे सोबतच होते. काहीवेळा कटु निर्णय घेतले असतील पण कुणालाही कह्यात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तसंच आमच्यामध्ये योग्य समन्वय होता. त्यामुळे आघाडीमध्ये कटुता निर्माण झाल्याचं आठवत नाही. सध्याच्या स्थितीत तीन पक्षांचं सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय कामाचा तसा अनुभव नाही. मात्र ते चांगलं काम करत आहेत. तसंच मी मुख्यमंत्री असताना जसं काम केलं त्याचा फायदा या कारभारात कसा होईल हे पाहतो आहे”, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

वडिलांच्या आठवणी

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांना हेडमास्तरही म्हटलं जायचं. कारण ते प्रचंड शिस्तप्रिय होते. ते घरातही असेच होते का? असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले की, माझे वडील शिस्तप्रिय होते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे मला खूप काही शिकायला मिळालं. सुशीलकुमार शिंदे, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, विलासराव देशमुख या सगळ्यांची कारकीर्द मला जवळून पाहता आली. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मी राज्यमंत्री होतो. त्यानंतर पक्षासाठी जे काम करत गेलो ते मनापासून केलं. त्यामुळेच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Running a coalition government is like a walking on a rope says ashok chavan scj

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या