मुंबई

टाळेबंदी किती दिवस चालेल माहीत नाही. दरवाढ कोणते टोक गाठेल सांगता येत नाही. धारावी, वरळीप्रमाणे आपलाही परिसर प्रतिबंधित झाला तर किराणाही मिळणार नाही. अशा एक ना अनेक शंका सध्या नागरिकांच्या मनात घर करून आहेत. भविष्याची तरतूद म्हणून दोन-तीन महिन्यांचे सामान एकत्र खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल सध्या दिसतो.

मुंबईत बऱ्याच गृहनिर्माण संस्थांनी रहिवाशांना बाहेर जाण्याच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. शिवाय दुकानात एकेका व्यक्तीलाच प्रवेश मिळत असल्याने रांगेत उभे राहावे लागते.  म्हणून एकाच दिवशी सगळी खरेदी करण्याचा विचार ग्राहक करतात.

सध्या लहान मुले घरात आहेत. त्यामुळे टाळेबंदी जाहीर झाल्या दिवसापासून ग्राहकांनी एकपेक्षा अधिक खाद्यपदार्थाची पाकिटे खरेदी करण्यास सुरुवात केली. परिणामी अनेक खाद्यपदार्थ आता दुकानातून नाहीसे झाले आहेत. उत्पादन आणि वाहतुकीतल्या अडचणींमुळे अन्नधान्य, डाळी आणि तेलाचे दर वाढले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर काय ही भीती  ग्राहकांमध्ये आहे.

किराणा माल मिळत राहील असे सातत्याने सांगण्यात येते. पण वरळी, धारावीसारख्या प्रतिबंधित के लेल्या परिसरांमध्ये काही काळ किराणाचीही दुकाने बंद राहिली आहेत. अशी वेळ आपल्यावर ओढवली तर अशी धास्तीही ग्राहकांमध्ये आहे.

‘दर महिन्याला प्रत्येकी बारा लिटरचा एक खोका अशी दहा खोकी तेल विकले जाते. या वेळी मात्र ३० ते ४० खोकी आणावी लागली. पण हे ग्राहक पुढच्या महिन्यात तेलाची खरेदी करणार नाहीत. त्यामुळे विक्रीचा एकू ण हिशोब तेवढाच होतो, असे गोराईच्या एव्हरफ्रे श सुपरमार्के टचे गिरीश पटेल यांनी नमूद केले. ‘रोजच्या गिऱ्हाईकांना किती माल लागतो याचा अंदाज आम्हाला असतो. त्यामुळे ग्राहकांनी कितीही मागणी केली तरी प्रत्येकाला ठरावीक किलोच कांदे-बटाटे आणि तांदूळ-गहू देतो, जेणेकरून सर्वाची गरज भागेल,’ असे ओमकार स्टोर्सच्या श्वेता चौधरी सांगतात. मोठय़ा भाजी बाजारांमध्ये एरव्ही तुडुंब गर्दी असते. त्यामुळे तेथे असणाऱ्या किराणा मालाचीही चांगली विक्री होते. आता बाजार बंद झाले आहेत किं वा विभागले गेले आहेत. त्यामुळे येथे असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानांना मात्र विक्री घटल्याचा वाईट अनुभव येत आहे.

भावनिक आणि मानसिक सुरक्षेसाठीच  

जेव्हा वातावरणात अनिश्चितता असते, तेव्हा आपले मन त्या अनिश्चिततेला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जाते आणि मन टोकाच्या प्रतिक्रिया देऊ लागते. ज्या वेळी अनिश्चिततेली टोकाची प्रतिक्रिया ही चिंतेची असते त्या वेळी माणसाला असे वाटू लागते जी वस्तू मला हवी आहे ती माझ्याजवळ जास्तीतजास्त प्रमाणात असेल तर त्यातून मला मानसिक सुरक्षितता मिळेल. माणसाचे जे वर्तन सध्या दिसून येत आहे त्यातून माणसाला मानसिक आणि भावनिक सुरक्षितता मिळत आहे. सध्या भावनिक आणि मानसिक सुरक्षितता शोधण्यासाठी माणसे अन्न-धान्य आणि भाजीपाला मोठय़ा प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. ही धास्तावलेल्या मनाची प्रतिक्रिया आहे. यासाठी अनुरूप प्रतिसाद म्हणजे काळजी असून प्रत्येकाने भाजीपाला, फळे आणि अन्न-धान्य काळजीपूर्वक साठवावे. यासाठी वास्तवाला, गरजांना आणि आरोग्याला धरून खरेदी करावी.

— डॉ. आनंद नाडकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

अनिश्चिततेचा परिणाम

सध्याची परिस्थिती आणखी किती काळ राहणार याचे ठोस उत्तर नसल्यामुळे प्रचंड अनिश्चितता आहे. याचा परिणाम म्हणून जे मिळेल ते साठवून ठेवण्याची प्रवृत्ती दिसत आहे. खरेदीसाठी गेल्यानंतर दिसेल ते सर्व काही विकत घेणे, एरवी कधीही न लागणाऱ्या वस्तूदेखील घेऊन ठेवणे असे वर्तन ग्राहकांमध्ये दिसते. ज्या व्यक्तींचा स्वभाव सतत नकारात्मक विचार करण्याचा आहे, अनावश्यक काळजी करत राहण्याचा आहे, यंत्रणांबाबत अविश्वास ज्यांच्या मनात असतो, त्यांना सतत आज मिळतेय म्हणजे उद्या मिळेलच असे नाही, हे वाटत राहते.  सरकारी यंत्रणांवर विश्वास, योग्य गोष्टींत मन रमवण्याची सवय असेल तर हा त्रास होणार नाही.

– डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे

नाशिक

खरेदीसाठी उडय़ा

नाशिक शहरातील किराणा मालाचे दर कमालीचे वाढूनही ग्राहकांनी भीतीपोटी खरेदीत हात आखडता घेतला नाही. मागणी प्रचंड वाढल्याने काही दुकानदारांनी निकृष्ट दर्जाचा मालदेखील ग्राहकांच्या माथी मारला. भाजीपाला खरेदीत वेगळी स्थिती नव्हती. घाऊक बाजारात अत्यल्प किमतीत विकला जाणारा भाजीपाला ग्राहकांना तिप्पट, चौपट दराने खरेदी करावा लागत आहे. या काळात घराघरातून कांद्याची मागणी कायम राहिली. पण, हॉटेल व्यवसाय बंद असल्याने खपावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगतात.

टाळेबंदीची घोषणा झाल्यापासून आजतागायत किराणा दुकान आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडे ग्राहकांच्या रांगा आहेत. दर महिन्याचा किराणा भरणाऱ्या अनेक ग्राहकांनी पुढील कित्येक महिन्यांची साठवणूक केली. मूळ किमतीवर नवीन छापील किंमत चिकटवण्याचे प्रकार घडले. भाववाढीने त्रस्त होऊनही ग्राहकांची साठवणुकीची मानसिकता बदलली नाही. खरेतर त्याची गरज नसताना इतकी खरेदी केली गेल्याचे धान्य व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.

प्रत्येकाने केवळ स्वत:पुरताच विचार करून मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित केले. या मानसिकतेमुळे आपल्यासह इतरांना काही गरजेच्या वस्तूही मिळाल्या नाहीत. दुकानांमधील फरसाण, अल्पोपहाराचे पदार्थ संपलेले होते. शासनाने दैनंदिन वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील असे वारंवार सांगूनही उपयोग झाला नाही.

पल्लवी भिडे,  गृहिणी, नाशिक

टाळेबंदीच्या काळात मुंबईत फळभाज्यांना प्रचंड मागणी आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मुबलक प्रमाणात भाजीपाला येत होता. त्यातील ७० ते ८० टक्के भाजीपाला मुंबई आणि उपनगरांमध्ये पाठविला जात आहे. त्यास भावही चांगले मिळतात. महाग असूनही ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात भााजीपाला खरेदी केला. वाशी बाजार समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर नाशिकच्या भाजीपाल्याची मागणी काहीअंशी कमी झालेली आहे.

किरण भांदुरे, भाजीपाला व्यापारी

ठाणे

रात्रीही रांगा

ठाण्यातही नागरिकांची वस्तू खरेदी करताना झुबंड उडाल्याचे चित्र आहे. ठाण्यातील घोडबंदर, वागळे इस्टेट, डोंबिवलीतील चिमणीगल्ली, कल्याण येथील कोळसेवाडी, बदलापूर येथील बेलवली, शनिनगर मांजर्ली, उल्हासनगर येथील कॅम्प एक-दोन येथे दररोज नागरिकांची झुंबड उडत असते. मोठय़ा किराणा दुकानात रांगा लावून वस्तू खरेदी करण्यात येत आहे.  रेशन दुकानांवरही सामाजिक अंतर न राखता भल्या मोठय़ा रांगा लागत आहेत. मोठय़ा दुकानांमध्ये  प्रत्येकजण सुमारे दीड ते दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिकची खरेदी करत आहे. रात्री १० नंतरही येथे खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या रांगा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करत असले तरीही नागरिकांकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

सध्या एक वस्तू जरी खरेदी करायची असेल तर दुकानाबाहेर किमान अर्धा तास रांग लावावी लागत आहे. त्यामुळे एक वस्तू खरेदी करण्याऐवजी एकदाच आठ दिवसांच्या सामानाची यादी घेऊन खरेदी केल्यास वेळ वाचतो.

– जितेंद्र कोथमिरे, ग्राहक, ठाणे</p>

मुंबई महानगर क्षेत्रात पुढील दोन महिने पुरेल इतका अन्न-धान्याचा साठा गेल्या महिन्याभरात जमा झाला आहे. या क्षेत्राला अन्न-धान्याचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठेत पुढील चार महिने पुरेल इतका अन्न-धान्याचा साठा उपलब्ध आहे. राज्य शासनाने घेतलेल्या एका निर्णयानुसार नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातील भाजीपाला थेट मुंबई मुंबईत जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. या निर्णयानुसार दररोज ५०० ते ६०० गाडय़ा भाजीपाला थेट मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्न-धान्य अथवा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा मुंबई महानगर क्षेत्राला नाही.

– अविनाश देशपांडे,सहसचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

नागपूर 

खाद्यतेलाची खरेदी वाढली

टाळेबंदी होताच राज्यात सर्वत्रच नागरिकांनी  गेल्या महिन्यात खाद्यतेलाची भरपूर साठवणूक केली. त्यामुळे मागणीत अचानक वाढ नोंदवली गेली. सणासुदीच्या काळात ज्याप्रमाणे किराणा घेण्यात येतो त्याच प्रमाणात खाद्यतेलाची उचल झाली. मात्र गेल्या दोन आठवडय़ांपासून तेल खरेदी नेहमीप्रमाणे होत आहे. साठवणूक थांबली आहे.

नागपुरात सर्व प्रकारचे खाद्यतेल मिळून दररोज एकूण शंभर टन तेल खपत होते. ही मागणी  गेल्या महिन्यात अचानक दुप्पट झाली होती. शहराच्या आसपास जवळपास आठ तेलाचे कारखाने असून ते सुरळीत सुरू आहेत. मात्र काही जिल्हे व शहराचा काही भाग सील केल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. असे असले तरी तेलाचा तुटवडा मात्र नाही.

– राजू ठक्कर, अध्यक्ष, ऑइल र्मचट असोसिएशन, नागपूर.

पुणे

माल मुबलक तरीही झुंबड

भीतीपोटीच धान्य, कडधान्याची नागरिक जादा खरेदी करत असल्याचे किरकोळ विक्रे त्यांचे म्हणणे आहे. बाजारात भुसार माल मुबलक आहे. मात्र, पोलिसांच्या र्निबधामुळे नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने एकाच वेळी जास्तीतजास्त किराणा माल तसेच भाजीपाल्याची खरेदी करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश दुकानदारांनी खरेदीदारांची गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक दुकानाबाहेर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

भाजीपाला बाजाराच्या तुलनेत घाऊक भुसार बाजारात फारशी गर्दी होत नाही. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच भुसार बाजारातील व्यापाऱ्यांकडून याबाबत काळजी घेण्यात येत आहे. भुसार बाजारातील कामकाजाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सर्व व्यवहार सामाजिक अंतर ठेवून पार पाडण्यात येतात. किरकोळ किराणा माल विक्रेत्यांच्या दुकानात सध्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाजारात भुसार माल मुबलक आहे. भुसार माल तसेच अन्नधान्याचे दर स्थिर आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यात सध्या कठोर निर्बंध आहेत. करोनामुळे नागरिकही शक्यतो सामाजिक अंतर राखून सर्व व्यवहार पार पाडत आहेत.

– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पुना र्मचट्स चेंबर