उंबरे (ता. राहुरी) येथील एका विवाहित महिलेला राजस्थानात अवघ्या ३० हजार रुपयांत विकण्यात आले आहे. शिर्डी परिसरातील एका रॅकेटचा या प्रकरणात सहभाग असून, मुख्य सूत्रधार नागपूर पोलिसांच्या हाती लागला आहे.
राहुरी तालुका बागायती असून उसाच्या शेतीमुळे तो सधन मानला जातो. या भागात झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. उंबरे येथील तीस वर्षे वयाच्या एका विवाहित महिलेला तिच्या रोहित नावाच्या मुलासह नागपूर येथील नंद संतलाल गुप्ता याने आमिष दाखवून पळवून नेले. या महिलेची तीस हजार रुपयांत राजस्थानात विक्री करण्यात आली. आरोपी नंद यास नागपूर पोलिसांनी दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली असता हा प्रकार उघडकीस आला. या महिलेचा रोहित हा मुलगा नंद याच्याकडेच मिळून आला. रोहितचीही विक्री होणार होती, पण नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती टळली.
महिला बेपत्ता झाल्यानंतर उंबरे येथील तिच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर दिली होती. पण नागपूर पोलिसांनी गुन्हा राहुरी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर आज तिच्या नवऱ्याची फिर्याद घेण्यात आली. महिलेच्या विक्री प्रकरणात शिर्डी परिसरातील एक रॅकेटचा संबंध आहे. नागपूर पोलिसांच्या चौकशीत ते निष्पन्न झाले आहे. महिलेचा पती हा शेतमजूर असून त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. गरीब महिला हेरून त्यांना आमिष दाखवून त्यांची विक्री हे रॅकेट करते. आरोपी नंद याला आता राहुरी पोलीस ताब्यात घेणार असून त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश होईल. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सर्व गुन्हेगारांना अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.