आज दसऱ्याच्यानिमित्ताने राज्याबरोबरच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगलीमध्येही शिवप्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दौडनंतर भाषण देताना संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आमदार, खासदार आणि लोकप्रितिनिधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

‘शिवप्रतिष्ठान दुर्गामाता दौड’च्या सांगता कार्यक्रमामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी मातृभूमीसाठी जगणारी माणसं हवीत असं मत व्यक्त करताना महापुरुषांची उदाहरण दिली. त्यानंतर त्यांनी देशातील राजकीय नेते आणि लोकप्रितिनिधी हे मातृभूमीसाठी जगणाऱ्या माणसांमध्ये गणले जात नाहीत अशा आशयाचं विधान केलं. हे प्रतिनिधी कामाचा पगार घेऊनही देशासाठी काम करताना दिसत नाहीत असा भिडे यांच्या टीकेचा सूर होता.

“अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती हसत हसत ऐन तारुण्यात दिली. आज आपल्या देशाला केवळ मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहिजेत. तिथचं नेमकी बोंब आहे,” असं म्हणत संभाजी भिडेंनी आपली नाराजी व्यक्त केली. पुढे त्यांनी थेट आमदार आणि खासदार यांचा उल्लेख करत टीका केली. “लोक निवडून देतात ते आमचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींना शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात. भाडोत्री, बेकार (आहेत ते.) कलंक आहे आपल्या लोकशाहीला आणि परंपरेलाही कलंक आहे,” असं म्हणत संभाजी भिडेंनी टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिडेंनी डॉक्टरांचाही केलेला अपमान
भिडे यांनी याच वर्षी मार्च माहिन्यामध्ये करोनाची भीती डॉक्टरांनी पसरवल्याच्या आशयाचे वक्तव्य केलं होतं. भाषणादरम्यान मास्क घालून बसलेल्या एका व्यक्तीला पाहून भिडेंनी, “तोंडावरचं काढ ते. गां* नाहीयस तू,” असं म्हटलं होतं. त्यानंतर उपस्थितांना हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं होतं. पुढे बोलताना संभाजी भिडेंनी, “करोना मुस्की (मास्क) बांधणं गां*पणाचं लक्षण आहे, डॉक्टरांना काय सांगायचं ते सांगू देत. डॉक्टर नालायक आहेत,” असंही म्हटलं होतं. “डॉक्टर लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका,” असंही संभाजी भिडेंनी करोनासंदर्भातील वक्तव्यामध्ये म्हटलं होतं..