मोठा पोलीस बंदोबस्त, परवानगीबाबत संदिग्धता
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची उद्या, रविवारी सकाळी नगर शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला आंबेडकरवादी संघटनांनी विरोध दर्शवला असून, या सभेवर ‘एल्गार मोर्चा’ नेण्याचा इशारा दिला आहे. भिडे यांची सभा व एल्गार मोर्चा या दोन्हीला पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परवानगी दिलेली नसली तरी या पाश्र्वभूमीवर व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सभा ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज सकाळी आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी अशोक गायकवाड, अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अमित काळे, रमेश भिंगारदिवे आदींशी चर्चा केली, मात्र पदाधिकारी एल्गार मोर्चा काढण्यावर ठाम होते. भिडे यांची सभा सकाळी १० वाजता टिळक रस्त्यावरील पटेल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे, तर त्याच्या विरोधासाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते सकाळी ९ वाजता टिळक रस्त्यावरीलच आंबेडकर स्मारकात जमा होऊन मोर्चा नेणार आहेत. सभेच्या पाश्र्वभूमीवर आंबेडकरवादी संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून विरोधासाठी आंदोलने सुरू केली आहेत.
सभेचे आयोजक, शिवप्रतिष्ठान संघटनेचे नगरमधील पदाधिकारी बापू ठाणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सभा पूर्वनियोजित आहे, त्याला परवानगी मिळालेली आहे. रायगडावर शिवाजीमहाराजांसाठी उभारले जाणारे सुवर्ण सिंहासन व त्याच्या पहाऱ्यासाठी कार्यकर्त्यांची निवड यासाठी सभा होणार आहे. सभेच्या विषयाचा इतर कोणत्याही गोष्टींशी संबंध नाही. भीमा-कोरेगावच्या घटनेशी गुरुजींचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, हे पूर्वीच स्पष्ट करण्यात आलेले आहे. गुरुजींबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. सभेसाठी सर्वाना प्रवेश खुला आहे.
आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की भिडे हे भीमा-कोरेगावच्या दंगलीतील प्रमुख आरोपी आहेत, ते फरार आहेत व पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. शिवाय, भिडे सातत्याने राज्यघटनेच्या विरोधात वक्तव्य करतात, त्याला आमचा विरोध आहे, त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. सभेला पोलीस बंदोबस्त देऊन सरकार संरक्षणात सभा घेत आहे.
सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सांगितले, की सभा व मोर्चाच्या परवानगीबाबत वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. सभेच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. शांतता राखण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.