लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. दरम्यान, युती आणि आघाडीतले पक्ष जागावाटपावर चर्चा करत आहेत. अशातच कोल्हापूरचे शाहू महाराज द्वितीय यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाहू महाराज कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेला उभे राहणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू आहे. या वृत्ताला शाहू महाराजांचे पुत्र आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील दुजोरा दिला आहे. संभाजीराजे म्हणाले, माझ्या वडिलांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण १००० टक्के योगदान देऊ. महाराजांचा अनुभव कोल्हापूरला वेगळी दिशा दाखवेल यात काही शंका नाही.

संभाजीराजे छत्रपती यांनी काही वेळापूर्वी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत? कारण सध्या शिवसेना आणि काँग्रेसची चर्चा ऐकायला मिळत आहे. महाराज पंजा आणि मशाल यापैकी कुठल्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत? यावर संभाजीराजे म्हणाले, महारांजांची भूमिका मी मांडू शकत नाही. महाराजांची भूमिका निश्चित आहे. तसेच इथल्या जनतेलाही महाराज हवे आहेत. महाराज प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आता त्यांच्या उमेदवारीबाबत मविआ काय निर्णय घेणार आणि महाराजांची भूमिका काय असेल ते आपल्याला लवकरच कळेल. मविआचे नेते आणि महाराज ती गोष्ट स्पष्ट करतील.

हे ही वाचा >> “मविआ नेत्यांमधील मतभेदांमुळे…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; जागावाटप न होण्यामागचं कारण स्पष्ट करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजीराजे म्हणाले, निवडणुकीत महाराजांबरोबर मी स्वतः असेन. आमचे सर्व सहकारी कामं करतील. महाराजांच्या प्रचारासाठी, निवडणूक जिंकवण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व प्रकारची मेहनत घेऊ. याप्रसंगी मी इतकंच सांगेन की मोठ्या महाराजांचा, माझा आणि मालोजीराजांचा (संभाजीराजे यांचे पुत्र) सगळीकडे संपर्क आहे. मी महाराष्ट्र पिंजून काढलाय. महाराजांसाठी मतदारसंघ पिंजून काढू. कोल्हापूर हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. हाच विचार देशभर जावा अशी महाराजांची इच्छा आहे. आम्ही त्यासाठी सर्व प्रकारची मेहनत घेऊ.