राज्यात राज्यसभा निवडणुकीने राजकारणाचा पारा चढला आहे. भाजपाने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत पूर्ण झालीच नाही. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढतीवर प्रतिक्रिया दिलीय. कोल्हापूरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं. त्यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “कोल्हापूरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे कोल्हापुरचाच खासदार होणार.”

दरम्यान राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (१० जून) मतदान झालं. या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत सहावा उमेदवार कुणाचा जिंकणार आणि सातवा उमेदवार कुणाचा पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपाकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. दोन्ही उमेदवार कोल्हापूरमधील असल्याने सहावा राज्यसभा खासदार कोल्हापूरमधूनच निवडून येणार आहे हे मात्र निश्चित आहे. हाच धागा पकडून संभाजीराजेंनी ट्वीट केलंय.

उमेदवार : प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप)

आमदारांचे संख्याबळ

भाजपा – १०६
शिवसेना – ५५
राष्ट्रवादी – ५३
काँग्रेस – ४४
अपक्ष व छोटे पक्ष २९

खुल्या पद्धतीने मतदान

राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते.

हेही वाचा : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, भाषणात संभाजीराजेंकडून गंभीर आरोप, म्हणाले…

राज्यसभा निवडणुकीत आमदारांची मते बाद होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हरयाणामध्ये काँग्रेसच्या १४ आमदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनाऐवजी वेगळ्या शाईच्या पेनाचा वापर केल्याने ही मते बाद ठरली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी मते भाजपच्या नेत्यांना दाखविल्याने ती मते बाद ठरली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण आपापल्या आमदारांना दिले आहे.