Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं असून आरोपी कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी आणि सीआयडीकडून करण्यात येत आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच वाल्मिक कराडला एसआयटीकडून ताब्यात घेण्यात आलेलं असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडचाही हत्येच्या घटनेत सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तसेच वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. ‘वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की थांबतो, कारण वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण मिळतंय’, असा गंभीर आरोप संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

संदीप क्षीरसागर काय म्हणाले?

“वाल्मिक कराडला सुरुवातीपासून संरक्षण आहे. सध्या माध्यमांतून ज्या गोष्टी समोर येत आहेत. प्रॉपर्टीचा जो खुलासा होत आहे. तसेच बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतात, त्यावेळी हे लक्षात ठेवावं की वाल्मीक कराडचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत? अटक व्हायला उशीर झाली आणि अटक झाल्यानंतर देखील जे काही कट कारस्थान आहे त्यातही अजून नाव आलेले नाही. त्यामुळे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगत आहे की मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे, पण वाल्मिक कराडला संरक्षण धनंजय मुंडेंचं आहे हे स्पष्ट दिसतं आहे”, असा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.

वाल्मिक कराडचे हात एवढे वरपर्यंत आहेत असं तुम्हाला वाटतं? ज्या पद्धतीने पोलिसांना वाल्मिक कराड शरण येतो, ज्या पद्धतीने प्रशासनाच्या समोर जातात. वाल्मिक कराडला तुरुंगात वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. मग वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की तपास थांबतो, हे सगळा महाराष्ट्र बघत आहे. जर घटनेच्या कालावधीमधील मोबाईलचे सीडीआर तपासले तर सगळं काही लक्ष येईल लक्षात येईल. तसेच प्रॉपर्टी संदर्भातला जो विषय आहे, त्या ट्रांजेक्शनवरून लक्षात येईल, आरोपापेक्षा तपास त्या दिशेने व्हायला हवा. मोबाईलचे सीडीआर आणि खात्याचे ट्रांजेक्शनवरून तपासले तरी कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे लक्षात येईल, असंही आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ईडीची एन्ट्री व्हायला हवी…’

वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी संदर्भातील चौकशीसाठी आतापर्यंत ईडीची एन्ट्री व्हायला हवी होती. ज्या पद्धतीने संपत्ती समोर येत आहे, त्यावरून तरी ईडीने चौकशी करायला हवी. पण वाल्मिक कराडवर मंत्री महोदयांचा वरदहस्त आहे. पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कोणालाही अटक करु शकतात”, असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं.