रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर भागात मोठी वाहतुक कोंडी होत असल्याने वाहतुकदार चांगलेच हैराण झाले आहेत. याठिकाणी सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे व बंदी असतानाही देखील अवजड वाहतुक सुरुच असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक संथगतीने सुरु आहे.
कोकणातील रत्नागिरीसह इतर दोन जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. मंगळवारी सात दिवसाच्या गणेशाला निरोप देण्यात येणार आहे. मात्र या गणेशोत्सव कालावधीत मुंबई वासिय कोकणकर कोकणात आल्याने येथील महामार्गाच्या कामांचा फटका बसला. मात्र या महामार्गावरील संगमेश्वर बाजारपेठ येथेच सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होत आल्याने वाहतूकदार चांगलेच हैराण झाले आहेत.
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता अवजड वाहनांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही अवजड वाहनांची वाहतुक अद्याप ही सुरूच असल्याने वाहतुक कोंडी वाढत आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलावर अवजड वाहनांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकून पडत आहेत. याबरोबर याचा फटका देखील दोन रुग्णवाहिका अडकून पडल्याने बसला होता.
सोनवी पुलाच्या दोन्ही बाजूने अवजड वाहतुक सुरु आल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुलावरील दोन अवजड वाहनांमुळे रस्ता बंद होत असल्याने वाहतुक पोलिसांना ही वाहतुक कोंडी सोडविणे अवघड जात आहे. मंगळवारी होणा-या गणेश विसर्जना नंतर देखील या भागात मोठी वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.