संगमनेर : संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर आज, बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. एकूण ३० नगरसेवक निवडून दिले जाणार असून, त्यांपैकी तब्बल १५ महिला असणार असल्याने पालिकेवर एक प्रकारे महिलाराज येणार आहे. महिलांसाठी निम्म्या जागा आरक्षित असतानाही आजच्या सोडतीला एकही महिला उपस्थित नव्हती. उपस्थित इच्छुक पुरुष उमेदवारांपैकी अनेकांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांची घोर निराशा झाली.
तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रशासक राज अनुभवणाऱ्या पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. साधारण १९८० पासून संगमनेर नगरपालिकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या भगिनी दुर्गा तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून मोठा कालखंड काम पाहिले. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही तांबे निवडून आल्या होत्या. सर्वप्रथम नगरपालिका थोरात यांच्या ताब्यात आली, त्या वेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही नगराध्यक्षपद भूषविले होते. याशिवाय उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांच्यासह अनेक दिग्गजांनी यापूर्वी संगमनेरचे नगराध्यक्षपद भूषविलेले आहे.
या वेळी नगराध्यक्षपद पुन्हा एकदा महिलेसाठी राखीव झाल्याने दुर्गा तांबे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, की अन्य कोणाला उतरविले जाते याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीने निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही, हेही तितकेच खरे आहे. निवडून आल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक सुमारे अर्धशतकानंतर पुन्हा एकदा जातीय ध्रुवीकरणाकडे जाणारी ठरते का, हे बघणे ही औत्सुक्याचे आहे. विधानसभेतील निकालामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला आहे. साहजिकच त्यांच्याकडे उमेदवारीसाठी मोठी मागणी निर्माण होणार आहे. याशिवाय वर्षानुवर्ष थोरात यांच्याकडून पद उपभोगलेले काही माजी पदाधिकारी महायुतीच्या गोटात सामील होणार असल्याचीही माहिती मिळते आहे.
थोरात गटाकडेही उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आहे. ताज्या अनुभवामुळे या वेळची पालिकेची निवडणूक ते अत्यंत गांभीर्याने घेतील यात शंका नाही. मात्र नगरसेवक म्हणून पुन्हा तेच ते चेहरे बघायला मिळतात, की सहकारी साखर कारखान्यासारखी भाकरी फिरविली जाते, यावर बरेचसे अवलंबून असणार आहे. महायुतीकडे गमावण्यासारखे काही नाही, परंतु कमावण्याची संधी त्यांना आहे. तर मोठा कालखंड सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला पालिकेतील सत्ता गमावणे परवडणारे नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगर परिषदेची आगामी निवडणूक कमालीची चुरशीची ठरणार यात शंका नाही.
दरम्यान, निवडून द्यावयाच्या ३० नगरसेवकांच्या जागांचे आरक्षण आज पीठासन अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोडतीने काढण्यात आले. पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार, प्रशासन अधिकारी संजय पेखळे आदी या वेळी उपस्थित होते.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १ ब – सर्वसाधारण, प्रभाग २ अ – अनुसूचित जाती, प्रभाग २ ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ३ ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ ब – सर्वसाधारण, प्रभाग ५ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ५ ब – सर्वसाधारण, प्रभाग ६ अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ ब – सर्वसाधारण, प्रभाग ७ अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ ब – सर्वसाधारण, प्रभाग ८ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ८ ब – सर्वसाधारण, प्रभाग ९ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ९ ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग १० अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग १० ब – सर्वसाधारण, प्रभाग ११ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ११ ब – सर्वसाधारण, प्रभाग १२ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग १२ ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ अ – अनुसूचित जाती महिला, प्रभाग १३ ब – सर्वसाधारण, प्रभाग १४ अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ ब – सर्वसाधारण, प्रभाग १५ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग १५ ब – सर्वसाधारण महिला.