सांगली : मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावून देतो असे सागून बनावट आदेश दाखवून सहा लाख रूपयांचा गंडा घालण्याचा प्रकार विट्यात घडला असून या प्रकरणी संशयिताविरूध्द पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रमेश भिमराव कांबळे (सध्या रा. फुलेनगर विटा, मुळ गाव मुंबई) आणि कुणाल राजाराम जाधव (रा.102, मुकुंद पॅलेस, ठाकुर वाडी,जुनी डोंबिवली,पश्चिम मुंबई) या दोघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित फसवणूक झालेल्या मुलाचे वडील किरण प्रताप भिंगारदेवे यांनी फिर्याद दिली आहे.  

विटा मधील भाजीपाला व्यवसायिक किरण भिंगारदेवे यांचा मुलगा सचिन आणि सूरज भस्मे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून रमेश कांबळे याने २२ मार्च २०१७ रोजी ते यावर्ष च्या जून महिन्यापर्यंत आरटीजीएसद्बारे,  रोख तसेच चलनाने कुणाल जाधव याच्या नावावर नोटरी करून प्रत्येकी तीन लाख रुपये प्रमाणे एकूण सहा लाख रुपये घेतले. शिवाय रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदावरती हजर राहणेबाबतचे पत्र या दोघांना दिले.

बनावट सही आणि शिक्क्याचे पत्र –

मात्र ही दोन्ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेरीस किरण भिंगारदेवे यांनी रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नोकरीची बनावट सही आणि शिक्क्याचे पत्र देवून फसवणूक केली असल्याबाबत शनिवारी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.