सांगलीतील तासगांव- कवठेमहांकाळ मार्गावर ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात १० मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. अपघातात १६ जण जखमी झाले असून एसटी बस बंद असल्याने मजूर ट्रकमधून कराडला जात होते, असे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकमधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने मजुरांनी एका ट्रकचालकाला कराडपर्यंत सोडण्याची विनंती केली. ट्रक फरशीने भरलेला असल्याने सुरुवातीला ट्रक चालकाने नकार दिला. मात्र मजुरांनी विनंती केल्याने त्याने कराडपर्यंत सोडण्याची तयारी दर्शवली, असे समजते. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यात फरशीखाली सापडून १० प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ११ जणांवर मिरजेतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  तर पाच जणांवर तासगांवमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.

कर्नाटकमधील सिंदगी गावातून कराड, सांगली या भागात फरश्यांचा पुरवठा होतो.  ट्रक चालकाला झोप येत असल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.