सांगली : ऑक्टोबर हिटच्या झळा दिवसभर बसत असताना बुधवारी रात्री आष्टा, इस्लामपूर परिसराला ढगांच्या गडगडाटासह आलेल्या जोरदार परतीच्या पावसाने झोडपले. आष्टा येथे रात्री नऊनंतर सलग चार तास पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टी नोंदवत अवघ्या चार तासांत आष्टा परिसरात १११ तर बहे परिसरात ८०.८ मिलीमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा कडाका असून सायंकाळी ढगांची गर्दी होऊन पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. आष्टा व बहे परिसरात तर रात्री सलग चार तास मुसळधार पाऊस कोसळला. मुसळधार पावसाने उसाच्या पिकात पाणी साचले असून रस्त्यावरून दोन फूट पाणी वाहत होते.

इस्लामपूर परिसरात सरासरी ३९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मंडळनिहाय झालेला पाऊस असा वाळवा ३२.५, कोरेगाव २.८, कुरळप १३.३, तांदूळवाडी ५४.८, ताकारी ४३, पेठ २०.५, बहे ८०.८, आष्टा १११, इस्लामपूर २७.५, कामेरी ४३, चिकुर्डे ४२.८ मिलीमीटर. तर सांगली, कुपवाड आणि कवलापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. या तीनही मंडळांत ४४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस असा मिरज १८, इस्लामपूर ३९.६, शिराळा २१.५, पलूस १३.८ आणि कडेगाव १०.५ मिलीमीटर. अन्य तासगाव, जत, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यात पाऊस झाला नाही.

पावसाने रब्बी हंगामासाठी आणि ऊस लावणीसाठी तयार केलेल्या रानात पाणी साचले आहे. यामुळे पेरणीची तयारी वाया गेली असून पीक लागणीसाठी तयार करण्यात आलेले वाफे पाण्याने भरले आहेत. सांगलीतून जुन्या बुधगाव रस्त्यावर गुरुवारी दुपारपर्यंत पाणी वाहत होते. वाहनधारक या पाण्यातून जात होते.