Sanjay Kaka Patil join Ajit Pawar Group:: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. यातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. आज भारतीय जनता पक्षाचे नेते तथा सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

माजी खासदार संजय काका पाटील हे तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात माजी खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) आणि रोहित पाटील (Rohit Patil) यांच्यात लढत होणार आहे.

हेही वाचा : Zeeshan Siddique : “बाबा मला तुमची रोज आठवण…”; झिशान सिद्दिकींची बाबा सिद्दिकींबाबत भावूक पोस्ट

सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून संजय काका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चांवर आता पडदा पडला आहे. त्यामुळे आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

प्रवेश करताच उमेदवारी जाहीर

माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर काही वेळातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता तासगाव -कवठेमहांकाळमध्ये संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय काका पाटील यांचा लोकसभेला झाला होता पराभव

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. लोकसभेला भारतीय जनता पक्षाकडून संजय काका पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या विरोधात विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय झाला होता, तर संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला होता. दरम्यान, संजय काका पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता ते विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच संजय काका पाटील यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.