सांगली : भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि देशसेवेत हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या परिवाराप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीत ‘एक दिवा सैनिकांसाठी‘ उपक्रम साजरा करण्यात आला. शहीद पांडुरंग साळुंखे संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून साजऱ्या करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विंग कमांडर प्रकाश नवले (शौर्यचक्र) (निवृत्त), ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, कर्नल भूषण कल्याणी (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी ’सांगली व्हीजन २०३०’बाबत सर्व सैनिकांना माहिती दिली. देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांचे पाठबळ प्रशासनाला मिळावे, या उद्देशाने माजी सैनिकांनी समाजात सक्रिय कार्य करावे, असे आवाहन केले. सैनिकांप्रति असणारे त्यांचे प्रेम, भावना आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना घेता आला.

ग्रुप कॅप्टन श्री. वालवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. भीमसेन चवदार यांनी प्रास्ताविक केले. ध्वजदिन निधीसाठी सुषमा सुरेश बाळ यांनी एक लाख रुपये, मिलिंद तनवडे यांनी ३० हजार रुपये, ॲड. सत्यजित शेगुंशी यांनी २१ हजार रुपये धनादेशाद्वारे सुपूर्द केल्याबद्दल, तसेच प्राचार्य ए. व्ही. कुलकर्णी यांनी ५ लाख रुपयांची सैनिक संकुलात विकासकामे केल्याबद्दल डॉ. चवदार यांनी आभार मानून १२ वर्षांत प्रथमच ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण गवळी यांनी आभार मानले. मुलांचे वसतिगृह अधीक्षक गजानन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला वीरपत्नी, वीरमाता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबित, तसेच तालुकानिहाय सैनिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक, सैनिकी वसतिगृहातील मुले व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रगीत व राज्य गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिक-अधिकाऱ्यांनी सैनिक परिवारासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.