मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही महिलेचं म्हणणं ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आरेरावी केल्याचा प्रकार त्यावेळी घडला. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना टोला हाणला आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं.

“आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. तिथली परिस्थिती नेमकी काय झालेली आहे. हे मला माहिती नाही. मी पण भास्कर जाधव यांना ओळखतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलंय. आम्ही एकत्र मंत्रिमंडळात होतो. त्यांनी असंही स्टेटमेंट केलं आहे की, ते त्यांच्या घरातील नातेवाईक होते. लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेले तर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहीजे.”, असं अजित पवार यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीच्या पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडले होते-

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं ते सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र नेमकं त्याचवेळी भास्कर जाधव यांनी महिलेला “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव” अशी प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहे.