सांगली : जन्मत: कर्णबधिरता. यामुळे ध्वनी-स्वरांची सांगड घालत संवाद साधण्याच्या कलेलाच मुकलेली ती चिमणी पाखरे. अबोल असलेल्या या पाखरांना शिक्षणाची संधी मिळत असली, तरी भविष्यातील रोजगाराचा प्रश्न कायमचाच. अशा चिमण्यांच्या ओठांवर शब्द रुळले नसले तरी काय झाले! त्यांनाही नव्या जगातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आत्मनिर्भर होण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यासाठी हात दिला आणि मिरजेच्या भिडे मूकबधिर शाळेतील ७३ मुले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर आत्मनिर्भर होण्यासाठी पुढे सरसावली. आता ही योजना जिल्ह्यातील १२ शाळांमध्ये ७०० मुलांसाठी राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोडला आहे.

जिल्हाधिकारी काकडे यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच मूकबधिर मुलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटियस प्रशिक्षण उपक्रम वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या मदतीने गेले पंधरा दिवस दिनेश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबविला. पाचवी ते आठवीच्या मूकबधिर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर थ्री-डी प्रिंटरमधून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली, तेव्हा तो केवळ एक प्रयोग नव्हता, तर त्यांच्या सुप्त सर्जनशीलतेला मिळालेला तो पहिला हुंकार होता.

त्यांनी सेन्सरच्या मदतीने आग लागल्यास किंवा वीज गेल्यास वाजणारा अलार्म बनवला. चॅट-जीपीटीमध्ये स्वत: टाइप करून आपल्या मनातल्या कल्पनांना चित्रांचे रूप दिले, तेव्हा त्यांच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज उरली नाही. तंत्रज्ञानाने त्यांना नवी ‘भाषा’ दिली, नवा ‘आवाज’ दिला आहे. हे प्रात्यक्षिक खुद्द जिल्हाधिकारी काकडे यांनी पाहून मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि हा प्रकल्प जिल्ह्यातील १२ मूकबधिर शाळांत राबविण्याबरोबरच त्यांना पुढील टप्प्यात व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे सूतोवाच केले.

जिल्हाधिकारी काकडे पुढे म्हणाले, असे उपक्रम शिकता शिकता कमवा योजनेत रूपांतरीत करू. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात भरवण्यासाठी प्रयत्न करू. नागरिकांनीही कोणताही मोलभाव न करता दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तु खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांची पत्नी शरदिनी काकडे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी भारत निकम, संस्थेचे सचिव सुरेश आवटी, सहसचिव निरंजन आवटी, परिमल पाटील, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहायक मंजिरी माने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी आदी उपस्थित होते.