सांगली : ऐन दिवाळी सणाच्या काळात २४ तासांत सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. सांगलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये दारू पिण्याच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली असून, तासगाव तालुक्यातील पाचवा मैल येथे एका व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला आहे.
चार दिवसांपूर्वी (दि. १५) तासगाव शहरातील इंदिरानगर परिसरात एका महिलेचा तलवारीने भोसकून खून करण्यात आला होता. जिल्ह्यात खुनाचे प्रकार वारंवार घडत असून, पोलीस यंत्रणेचा वचक कमी झाला आहे का, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.
रोहित आवळे (वय २२ रा. चिंतामणीनगर, सांगली) हा तरुण रात्री मित्रासोबत दारू पित होता. त्या वेळी बोला-चालीतून वाद झाला. या वादात मित्रांनीच त्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. मध्यरात्री याची माहिती मिळताच संजयनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासोबत दारू पिण्यास असलेल्या व जवळचे मित्र असलेल्या सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतल्यानंतरच खुनामागील खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे निरीक्षक कदम यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी दुपारी तासगाव ते भिलवडी मार्गावर असलेल्या पाचवा मैल परिसरात असलेल्या वस्तीवर चैतन्य पवार (वय ४४) याचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. संशयित व्यक्ती आणि पवार यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या वादातूनच त्याच्यावर कुऱ्हाडीने घाव घालण्यात आला. घाव वर्मी बसल्याने पवार याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार आहे.
चार दिवसांपूर्वी (दि. १५) तासगाव शहरातील इंदिरानगर परिसरात शांताबाई जगन पवार (वय ७०) या महिलेचा तलवारीने भोसकून खून करण्यात आला होता. हा खून तिचा मुलगा जगन पवार यानेच नशेत असताना किरकोळ कारणावरून केला होता. ही घटना पारधी समाजाची वसाहत असलेल्या इंदिरानगरमध्ये घडली होती. आजही भरदिवसा पाचवा मैल येथे झालेली खुनाची घटना पारधी वस्तीवरच झाली आहे. जिल्ह्यात खुनाचे प्रकार वारंवार घडत असून, पोलीस यंत्रणेचा वचक कमी झाला आहे का, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.